Advertisement

सर्वसामान्यांसाठी ५०० ते ६०० रुपयात उपलब्ध होणार कोरोनाची लस


सर्वसामान्यांसाठी ५०० ते ६०० रुपयात उपलब्ध होणार कोरोनाची लस
SHARES

मार्च महिन्यात देशभरात दाखल झालेल्या जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळं अनेकांना आपला जीव गमवावा लागला. या व्हायरसवर अद्याप कोणतही औषध उपलब्ध नाही. मात्र या व्हायरसचा मुळापासून नष्ट करण्यासाठी जगातील सर्व डॉक्टर लस बनविण्याच्या कामात व्यग्र आहेत. अशातच ऑक्सफर्ड आणि अ‍ॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केलेली ‘कोव्हिशील्ड’ ही लस फेब्रुवारी महिन्यात भारतात वितरीत व्हायला सुरुवात होणार आहे. या लसीची किंमत ५०० ते ६०० रूपये इतकी असेल, अशी माहिती सिरम इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी दिली आहे.

कोरोनाच्या संकटामुळे तणावाखाली असलेल्या भारतीयांना खूप मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अदर पूनावाला यांनी एका वृत्तसंस्थेच्या कार्यक्रमात ही माहिती दिली. सिरम इन्स्टिट्यूटकडून पुढच्या महिन्यात केंद्र सरकारकडे ‘कोव्हिशील्ड’च्या तातडीच्या मंजुरीसाठी अर्ज करण्यात येणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात आरोग्य सेवक आणि ज्येष्ठ लोकांना ही लस देण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. तर सामान्य जनतेसाठी मार्च किंवा एप्रिल महिन्यापासून ही लस उपलब्ध होईल. ही लस साठवून ठेवण्यासाठी 2°C ते 8°C अंश सेल्सिअस तापमानाची गरज असेल. तर या लशीच्या एका डोसची किंमत ५०० ते ६०० रुपये असेल, अशी माहिती अदर पुनावाला यांनी दिली. मात्र, केंद्र सरकार या लशीची मोठ्याप्रमाणावर खरेदी करणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी या लशीची किंमत २२५ ते ३०० रुपये इतकी असेल, असेही पुनावाला यांनी सांगितले.

'कोव्हिशील्ड’ लस भारतात उपलब्ध झाल्यानंतर देशभरात तिचे वितरण करण्यासाठी केंद्र सरकारकडून तयारी सुरु झाली आहे. त्यासाठी सध्या देशभरात ‘कोल्ड चेन स्टोरेज’ची यंत्रणा उभारण्याचं काम सुरु आहे. शिवाय, प्रमुख विमानतळांवर कार्गो युनिटस तैनात करण्यात आले आहेत. दिल्ली आणि हैदराबाद विमानतळांचे व्यवस्थापन करणाऱ्या जीएमआर ग्रूपने दोन्ही ठिकाणी कुलिंग चेंबर्स उभारले आहेत. तर स्पाईस जेटच्या कार्गो इकाई, स्पाईस एक्स्प्रेसने ‘ग्लोबल कोल्ड चेन सोल्यूशन’ या कंपनीसोबत करार केला आहे. त्यामुळे कोरोना लशीची कमी तापमानात वाहतूक करता येणे शक्य होणार आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा