धक्कादायक! ३,७०० प्राध्यापकांनी एकही उत्तरपत्रिका तपासली नाही!

एकीकडे विद्यापीठ परीक्षाच्या द्वितीय सत्रात काही गोंधळ होऊ नये, यासाठी मास्टर प्लॅन तयार केलाय; तर दुसरीकडे पहिल्या सत्रात ३,७०० प्राध्यांपकांनी उत्तरपत्रिका तपासणीसाठी एकदाही लॉगीन केले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विद्यापीठाचा अनागोंदी कारभार समोर आला आहे.

द्वितीय सत्रासाठीचा मास्टर प्लॅन सांगण्यासाठी विद्यापीठातर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी विद्यापीठाकडूनच ही माहिती समोर आली आहे. ऑनलाईन पेपर तपासणीसाठी नेमण्यात आलेल्या प्राध्यापकांनी त्यांच्या नावाने लॉगइन करणे आवश्यक होते. त्यानंतरच प्राध्यापकांना पेपर तपासणी करणे शक्य होते. मात्र, १६,८०० प्राध्यापकांपैकी तब्बल ३ हजार ७०० प्राध्यापकांनी लॉगइनच केले नसल्यामुळे त्यांनी एकही पेपर तपासला नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

नक्की झालं तरी काय?

उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरु असताना या प्राध्यापकांनी लॉग इन न केल्याची बाब एकदाही विद्यापीठाच्या लक्षात आली नसेल का? जर विद्यापीठाच्या लक्षात ही बाब आली असेल, तर विद्यापीठाने त्या प्राध्यापकांवर तेव्हाच का कारवाई केली नाही? निकाल लवकरात लवकर लावावेत यासाठी विद्यापीठावर दबाव येत असताना या ३ हजार ७०० प्राध्यापकांविषयी विद्यापीठाकडून काहीच सांगितलं का गेलं नाही? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

त्यांच्यावर कारवाई होणार

ज्यांनी एकदाही लॉगइन केले नाही, एकही उत्तरपत्रिका तपासली नाही, अशा प्राध्यापकांवर कारवाई होणार आहे. मात्र, त्या प्राध्यापकांनी नेमके कोणत्या कारणामुळे लॉगइन केले नाही, याची माहिती उपलब्ध नाही. त्याची माहिती घेतली जाईल आणि नंतरच त्या प्राध्यापकांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठाचे प्रकुलगुरू देवानंद शिंदे यांनी दिली.


हेही वाचा

मुंबई विद्यापीठाचे 'दिवस फिरले'! इंजिनिअरींगच्या परीक्षेसाठी 'जून २०१७' चं वेळापत्रक केलं तयार

पुढील बातमी
इतर बातम्या