Final Year Exams: एटीकेटीच्या परीक्षा २५ सप्टेंबरपासून

मुंबई विद्यापीठाने तयार केलेल्या आराखड्यानुसार प्रात्यक्षिक परीक्षा १५ सप्टेंबर २०२० पासून सुरू झाल्या असून २५ सप्टेंबर २०२० पासून एटीकेटीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात होणार आहेत. यामध्ये ऑनलाईन पद्धतीचा वापर केला जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा देणं शक्य नसेल अशा विद्यार्थ्यांची ऑफलाईन पद्धतीद्वारे परीक्षा घेण्याचे नियोजन विद्यापीठामार्फत करण्यात आलं आहे. तर दिव्यांग विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. सर्व थिअरी परीक्षा ५० गुणांसाठी आणि एक तास कालावधीच्या असतील. (mumbai university declares atkt exam date)

मुंबई विद्यापीठात परिक्षेसंदर्भातील आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, कायदा व सुव्यवस्था सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील,संबंधित अधिकारी  उपस्थित होते. यावेळी अंतिम वर्ष /अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठांना शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असं उदय सामंत यांनी संगितलं.

हेही वाचा - मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्ष परीक्षेचा अर्ज भरण्यास 'इतकी' मुदतवाढ

मुंबई विद्यापीठांतर्गत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या २ लाख  ४७ हजार  ५०० अशी आहे. यामध्ये नियमित परीक्षा देणारे १ लाख  ७० हजार विद्यार्थी असून उर्वरित ७२ हजार ५०० हे विद्यार्थी एटीकेटी चे आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेबाबत कोणतेही संभ्रम करून घेऊ नयेत. विद्यापीठाकडून परीक्षेसंदर्भात वेळोवेळी अधिकृत सूचना विद्यार्थ्यांना देण्यात येतील, असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.

उदय सामंत पुढं म्हणाले, मुंबई विद्यापीठामध्ये अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या राज्यात सर्वाधिक आहे. परीक्षा घेत असताना परीक्षेच्या प्रक्रियेतून एकही विद्यार्थी सुटता कामा नये, त्यासाठी विद्यापीठ विशेष प्रयत्न करीत आहे. यामध्ये विद्यापीठाकडून सर्व शक्यतांचा अभ्यास करून नियोजन करण्यात आले आहे. तसंच सराव प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून उपलब्ध करून दिली जाणार आहे.

अंतिम वर्षाच्या ज्या विद्यार्थ्यांनी आपला परीक्षा अर्ज भरलेला नाही त्यांच्यासाठी विशेष बाब म्हणून विद्यापीठाने १८, १९, २० सप्टेंबर २०२० रोजीचा वाढीव कालावधी दिलेला आहे. या वाढीव तीन दिवसांच्या कालावधीत विद्यार्थ्यांना अर्ज भरता येईल.

अंतिम वर्षाच्या परीक्षा घेऊन निकाल जाहीर करण्यासाठी महाराष्ट्रातील विद्यापीठांना ३१ ऑक्टोबरपर्यंतची मुदतवाढ मिळाली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठाला पत्र लिहून ही परवानगी दिली आहे. या पत्रानुसार आता राज्यातील विद्यापीठांना ३१ ऑक्टोबरपर्यंत परीक्षा प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

हेही वाचा - ३ ऑक्टोबरपासून होणार ‘आयडॉल’ची अंतिम वर्षांची परीक्षा
पुढील बातमी
इतर बातम्या