मुंबई विद्यापीठाकडून पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या परीक्षा पुन्हा कॉलेजांमार्फत घेण्याचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या अकॅडमिक कौन्सिलच्या बैठकीत या निर्णयास मंजुरी मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण बैठकीत या प्रस्तावाला मान्यताच न मिळाल्याने हा प्रस्ताव विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाकडे पाठवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान परीक्षा मंडळाला याबाबत अहवाल सादर करण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यानंतरच याबाबत अंतिम निर्णय होणार आहे.
मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी परीक्षा पद्धतीत समानता आणण्यासाठी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम आणि द्वितीय वर्ष परीक्षा या विद्यापीठामार्फत घेण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयावर महाविद्यालयातील प्राचार्यांनी नाराजी व्यक्त करत, या परीक्षा पुन्हा कॉलेजांमार्फत घेण्याची मागणी केली होती. तसेच या निर्णयामुळे महाविद्यालयांचे नियोजन कोलमडत असून विद्यापीठावरील ताण वाढेल, असंही बोललं जात होतं. त्यामुळे हा निर्णय मागे घेऊन पुन्हा परीक्षा महाविद्यालयांकडे सोपवण्याची मागणी प्राचार्याद्वारे केली जात होती.
प्राचार्यांनी केलेली मागणी नुकतीच मॅनेजमेंट कौन्सिलच्या बैठकीत मंजूर करण्यात आली. त्यानंतर पुढील मान्यतेसाठी अकॅडमिक कौन्सिलकडे हा निर्णय पाठवला गेला. त्यानुसार नुकतीच अकॅडमिक कौन्सिलची बैठक पार पडली. यामध्ये याबाबत सविस्तर चर्चा करून या निर्णयाला काही सदस्यांनी मान्यताही दर्शवली. परंतु, हा प्रश्न विद्यापीठाच्या परीक्षा विभागाशी संबंधित असल्यानं हा प्रस्ताव परीक्षा मंडळाकडे पाठवण्यात आला आणि यावर परीक्षा मंडळाला अहवाल सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी नॅशनल फोरम फॉर क्वॉलिटी एज्युकेशन यांच्याद्वारे या प्रस्तावाला विरोध केला गेला. शिवाय या परीक्षा विद्यापीठामार्फतच घेण्याचा आग्रह करण्यात आला. त्यामुळे विद्यापीठ हा निर्णय घेताना कोणतीही घाई करणार नसून संपूर्ण विचार करुनच हा निर्णय घेईल, असा अंदाज सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या निर्णयावर विद्यापीठ नेमकी काय भूमिका घेते? याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे.
हेही वाचा -