अभ्यासक्रम नवा, प्रश्न जुने! एलएलबीच्या प्रश्नपत्रिकेत पुन्हा घोळ!

मुंबई विद्यापीठाच्या विधी (लाॅ) विभागाचा कारभार पूर्वपदावर येत असल्याचं म्हटलं जात असतानाच पुन्हा नवा घोळ समोर आला आहे. एलएलबीच्या विद्यार्थ्यांना यंदाच्या वर्षापासून नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात आला आहे. मात्र विद्यापीठानं परीक्षेची प्रश्नपत्रिका काढताना ती जुन्याच अभ्यासक्रमाप्रमाणे काढल्याने विद्यार्थी बुचकळ्यात पडले आहेत. यामुळे विद्यापीठाचा अजब-गजब कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

सध्या एलएलबीसाठी ३ आणि ५ वर्षांचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या दोन्ही अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाला (सेमिस्टर ६ आणि सेमिस्टर १०) 'लॉ रिलेटिंग टू वूमन अँड चिल्ड्रन' हा विषय असतो. या विषयाची लेखी परीक्षा १५ जूनला घेण्यात आली. या लेखी परीक्षेत वगळण्यात आलेल्या अभ्यासक्रमातील प्रश्न विचारल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे.

कुठले विषय वगळले?

मुंबई विद्यापीठाने एलएलबीसाठी जाहीर केलेल्या परीपत्रकात 'प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन अगेन्स्ट सेक्शुअल ऑफेन्स' २०१२ ( protection of children against sexual offence act 2012) आणि 'जुविनाईल जस्टिस अॅक्ट' २००० ( juvenile justice act 2000 ) हे विषय वगळले आहेत. त्याऐवजी चाईल्ड प्रोटेक्शन, सोशल लिगिसेल्शन, लॉ रिलेटिंग टू डोमॅस्टिक व्हायलन्स, सेक्शुअल हॅरेसमेंट अॅट वुमन वर्कप्लेस ( child protection, social legislation, law relating to domestic violence, sexual harassment of women at workplace (prevention, prohibition, and redressal) act 2013) यांसारखे विविध विषय सामाविष्ट केल्याची माहिती देण्यात आली आहे.

परिपत्रक न मिळाल्याचा दावा

त्यानंतर विद्यार्थ्यांनी नवीन विषयांचा अभ्यास केला परंतु विद्यार्थी परीक्षेला गेल्यानंतर प्रश्नपत्रिकेत २ गुणांचा एक थोडक्यात आणि १२ गुणांचा एक सविस्तर प्रश्न असे १४ गुणांचे प्रश्न विचारण्यात आले. त्यावर अनेक विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवत विद्यार्थ्यांना संबंधित शिक्षकांना याबाबत विचारणा केली. परंतु शिक्षकांनी याबाबत विद्यापीठानं आम्हाला कोणतही परीपत्रक दिलं नसल्याचा दावा केला.

विशेष म्हणजे या प्रकरणाबाबत सर्व विद्यार्थ्यांनी स्टुंडन्ट लॉच्या सोबत प्र - कुलगुरूंकडे दाद मागितली होती. परंतु याबाबत आतापर्यंत विद्यापीठानं कोणतीही भूमिका घेतली नसल्यानं विद्यापीठ प्रशासनाचा भोंगळ कारभार स्पष्ट होत आहे.

भरपाई द्या

परीक्षेच्या आधी एक अभ्यासक्रम देऊन त्यानंतर परीक्षेत वेगळेच प्रश्न विचारून विद्यापीठाला नेमक काय सिद्ध करायचं आहे. सध्या 'लॉ'च्या अभ्यासक्रमात सुरू असलेल्या गोंधळामुळे सर्व विद्यार्थी आधीच खूप संतापले आहेत. त्यातच परीक्षेत वगळण्यात आलेल प्रश्न विचारल्यानं विद्यार्थ्यांच प्रचंड नुकसान झालं आहे. आणि विद्यापीठ प्रशासनानं त्याची भरपाई करून द्यावी, अशी मागणी स्टुडंट लॉ कॉऊन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी केली.

मी ५ वर्षांचा एलएलबी कोर्स करत असून सेमिस्टर १० मध्ये आम्हाला 'लॉ रिलेटिंग टू वूमन अँड चिल्ड्रन' हा विषय आहे. हा विषय अत्यंत सोपा असल्यानं ८० टक्के विद्यार्थी या विषयाची निवड करतात. विद्यापीठानं नवीन अभ्यासक्रमानं प्रश्नपत्रिका न काढता जुन्या अभ्यासक्रमाप्रमाणे प्रश्नपत्रिका काढल्या. यात १४ गुणांचे प्रश्न जुन्या अभ्यासक्रमानुसार विचारल्याने बऱ्याच विद्यार्थ्यांनी ते प्रश्न लिहिले नाहीत. विद्यापीठाच्या चुकीमुळे आम्हाला हे गुण मिळणार नाहीत. त्यामुळे विद्यापीठाने सर्व विद्यार्थ्यांना १४ गुण द्यावेत.

- सर्जेराव पाटील, विद्यार्थी


हेही वाचा-

लॉचे निकाल लागले, पण त्यातही गोंधळ!

निकाल लागायच्या आधीच पुढच्या परीक्षा जाहीर, 'लाॅ'चे विद्यार्थी हैराण


पुढील बातमी
इतर बातम्या