अखेर विद्यापीठाने दिले ६४५८ शिक्षकांना मानधन

मुंबई विद्यापीठात उद्भवलेल्या परीक्षेच्या निकाल गोंधळप्रकरणी जवळपास बरेच शिक्षकांचे उत्तरपत्रिका तपासणीचे मानधन विद्यापीठाने दिले नसल्याने विद्यापीठ प्रशासन नव्या वादात अडकले होते. मात्र, अखेर प्रथम सत्रातील जवळपास ६४५८ प्राध्यापकांना मानधन अदा केल्याचे विद्यापीठाने कळवले आहे. कुलगुरूंच्या बैठकीत त्यांनी शिक्षकांच्या मानधनाचा आढावा घेतला. त्यावेळी ही माहिती देण्यात आली. सोबतच जसजशी देयके विद्यापीठाला प्राप्त होतील, तशी ती अदा करण्यात येतील, अशी हमीही त्यांनी दिली आहे.

अतिरिक्त प्राध्यापकांना अतिरिक्त डीएच्या घोषणा

मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाइन मूल्यांकनाचे परीक्षा विभागावरील ओझे कमी करण्यासाठी मुंबई विद्यापीठासह इतर विद्यापीठांतील प्राध्यापकांचीही तपासणीसाठी मदत घेण्यात आली. मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाइन मूल्यांकनाचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी प्राध्यापकांना अतिरिक्त डीए आणि इतर लाभ देण्याच्या घोषणा विद्यापीठाने केल्या.

अखेर विद्यापीठाने देयके दिली

मात्र, विद्यापीठाने दिलेली ही सर्व आश्वासने हवेत विरली आणि शिक्षकांना पेपर तपासणीचे मानधन दिले गेले नाही. त्यासाठी मुक्ता संघटनेने त्याचा पाठपुरावा विद्यापीठाकडे केला होता. कुलगुरू, कुलसचिव आणि परीक्षा संचालकांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. यानंतर प्रसारमाध्यमांनी याला वाचा फोडल्यानंतर विद्यापीठाने तेथे सक्षम अधिकारी नेमले होते. त्यामुळे विविध CAP सेंटर्सद्वारे आणि प्रध्यापकांद्वारे प्राप्त झालेली देयके अखेर विद्यापीठाने देऊ केली आहेत.

एका शिक्षकाचे किमान मानधन ५ हजार गृहीत धरले, तरी साधारणतः ३० लाख रुपये मानधन शिक्षकांना मिळवून देण्यात आमचे प्रयत्न कामी आले. या निमित्ताने आम्ही कुलगुरू, प्रकुलगुरू आणि प्रसारमाध्यमांचे देखील आभारी आहोत.

प्रा. सुभाष आठवले, मुक्ता शिक्षक संघटना

मानधन रखडलेल्यांनी संपर्क करण्याचे आवाहन

येणा-या नवीन सत्राची परीक्षा सुरू झालेली आहे. त्यांचे पेपर तपासणीचे कामदेखील पुढे येणार आहे. त्यामुळे आता मानधन मिळाल्याने येणाऱ्या सत्रातील उत्तरपत्रिका शिक्षक स्वतःहून तपासतील याबद्दल शंका नाही. अजूनही ज्यांचे मानधन रखडले आहे, त्यांनी कृपया पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन मुक्ता संघटनेने केले आहे.


हेही वाचा

विद्यापीठाने पुनर्मूल्यांकनातून कमावले ४ कोटी ८३ लाख, निकाल अजूनही प्रलंबित

पुढील बातमी
इतर बातम्या