मुंबई विद्यापीठ टाॅप १०० च्या यादीबाहेर

  • मुंबई लाइव्ह टीम & सीमा महांगडे
  • शिक्षण

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जाहीर केलेल्या नॅशनल रॅकिंगमध्ये मुंबई विद्यापीठाने घोर निराशा केली असून मुंबई विद्यापीठाला पहिल्या १०० विद्यापीठात देखील स्थान मिळवता आलेलं नाही.

'या' कारणांमुळे घसरण

या उलट पहिल्या १०० विद्यापीठांत मुंबईतील इतर ४ विद्यापीठांचा, तर महाराष्ट्रातील ८ विद्यापीठांचा समावेश करण्यात आला आहे. अध्यापनाचा घसरलेला दर्जा, निकालातील गोंधळ, विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात कमतरता अशा विविध कारणांमुळे मुंबई विद्यापीठाचा दर्जा घसरला असून विद्यापीठाला १८३ व्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं आहे.

यादीत कुणाचा समावेश

'एमएचआरडी'ने जाहीर केलेल्या यादीत बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीने यादीत १९ वा क्रमांक, होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूटने २६ वा, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने ३२ वा तर नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिजने ५५ वा क्रमांक मिळवण्यात यश मिळवलं आहे.

झेविअर्स सर्वोत्कृष्ट काॅलेज

सर्वोत्कृष्ट काॅलेजांच्या यादीत मुंबईच्या सेंट झेविअर्स कॉलेजने ७४ वा क्रमांक मिळवला आहे. विलेपार्लेच्या मिठीबाई काॅलेजनेही पहिल्या २०० मध्ये आपलं स्थान कायम राखण्यात यश मिळवलं आहे.

राज्यात कोण?

पहिल्या १०० विद्यापीठाच्या यादीत महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाने ९ वं स्थान पटकावलं आहे. पुण्याच्या सिम्बॉयसीस विद्यापीठाने ४४ वं तर डॉ. डी. वाय. विद्यापीठाने ५२ वं स्थान मिळवण्यात यश मिळवलं आहे. पुण्याच्याच भारती विद्यापीठाने ६२ वा क्रमांक मिळवला आहे.

आधीपासूनच प्रश्न

विद्यापीठाच्या रॅकिंगवर आम्ही आधीपासूनच प्रश्न उपस्थित केला होता. विद्यापीठाच्या ढासळलेल्या दर्जामुळे आज ही परिस्थिती ओढवली आहे. सिनेट म्हणून निवडून आल्यानंतर आता आमच्यापुढे विद्यापीठाचा दर्जा व रॅकिंग सुधारणं हे मोठं आव्हान आहे.

सुप्रिया कारंडे, सिनेट सदस्य, युवासेना


हेही वाचा-

मुंबई विद्यापीठाचा 'मायमराठी' प्रकल्प, आता जगात कुठेही शिका मराठी

मुंबई विद्यापीठात पूर्णवेळ कुलगुरू पाहिजे, एसएफआयची मागणी


पुढील बातमी
इतर बातम्या