आरटीई प्रवेशप्रक्रिया २५ फेब्रुवारीपासून

शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत समाजातील दुर्बल व वंचित घटकांना मोफत शिक्षण देण्यात येतं. या प्रक्रियेसाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्के विद्यार्थ्यांसाठी जागा राखून ठेवणं बंधनकारक असतं. यंदा आरटीई प्रवेशाची कार्यवाही शिक्षण विभागाकडून सुरू करण्यात आली असून, त्यानुसार येत्या २५ फेब्रुवारीपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

अशी असते प्रवेशप्रक्रिया

मोफत व सक्तीच्या बालशिक्षण हक्क कायद्यानुसार वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येते. त्यानुसार खासगी शाळांमध्यं विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के जागा राखून ठेवणं बंधनकारक आहे. त्यानुसार दरवर्षी दाखल झालेल्या अर्जांची ऑनलाईन लॉटरीद्वारे निवड करण्यात येते. त्यानंतर आरटीईद्वारे या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. या जागांवर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची फी केंद्र व राज्य सरकारमार्फत संबंधित शाळांना दिली जाते.

१४ मार्चला पहिली सोडत

यंदाच्या शैक्षणिक वर्षात आरटीई अंतर्गत ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया २५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. यासाठी शाळांना २२ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करता येणार असून, या प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख ११ मार्च असणार आहे. यानुसार २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील आरटीई अंतर्गत प्रवेशाची पहिली सोडत १४ मार्च रोजी होणार आहे.

वेळापत्रक लवकरच जाहीर

यंदाची आरटीई प्रक्रिया कशी असेल, कोणकोणती कागदपत्रं विद्यार्थ्यांना देणं बंधनकारक असेल याबाबतची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. येत्या काही दिवसात २०१९-२० या वर्षीच्या ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं जाणार आहे. दरम्यान २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात आरटीईच्या २५ टक्के राखीव जागांची प्रवेशप्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यासाठी एकूण ८००० जागा उपलब्ध होत्या, तर तब्बल १० ते १५ हजार अर्ज आले होते.


हेही वाचा -

अजब गणित! आठवडा एक, सिनेमे ५२?

पश्चिम रेल्वेसाठी २८१५ सीसीटीव्ही कॅमेरे मंजूर


पुढील बातमी
इतर बातम्या