अजब गणित! आठवडा एक, सिनेमे ५२?

जेव्हा एकाच आठवड्यात तब्बल ५२ सिनेमे प्रदर्शित होतात, तेव्हा प्रेक्षकांनी नेमकं काय पाहावं हा मुद्दा अंतर्मुख होऊन विचार करण्यासारखा आहे.

  • अजब गणित! आठवडा एक, सिनेमे ५२?
  • अजब गणित! आठवडा एक, सिनेमे ५२?
  • अजब गणित! आठवडा एक, सिनेमे ५२?
SHARE

एका वर्षाचे ५२ आठवडे… या ५२ आठवड्यांमधील प्रत्येक शुक्रवार प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज असतो, पण जेव्हा एकाच आठवड्यात तब्बल ५२ सिनेमे प्रदर्शित होतात, तेव्हा प्रेक्षकांनी नेमकं काय पाहावं हा मुद्दा अंतर्मुख होऊन विचार करण्यासारखा आहे.


मराठीची संख्या जास्त

८ फेब्रुवारीला विविध भाषांमधील एकूण ५२ सिनेमे बाॅक्स आॅफिसवर प्रदर्शित झाले. यात मराठी-हिंदीसह इतर भाषिक सिनेमांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश होता. मराठी भाषेत तर नेमके किती सिनेमे प्रदर्शित झाले याबाबतच संभ्रम होता. काही ठिकाणी सात, तर काही ठिकाणी नऊ सिनेमे प्रदर्शित होण्याची चर्चा होती. वास्तवात मात्र एकूण ११ सिनेमे प्रदर्शित झाले. ‘भाई – व्यक्ती की वल्ली उत्तरार्ध’, ‘लकी’, ‘रेडीमिक्स’, ‘आसूड’, ’१०वी’, ‘धडपड’, ‘प्रेमरंग’, ‘प्रेमवारी’, ‘उनाड मस्ती’, ‘दिव्यांग’ आणि ‘मुंबईचा किनारा’ या मराठी सिनेमांनी आपलं नशीब आजमावलं.


हिंदीत आठ

या मागोमाग हिंदीमध्ये एकूण आठ सिनेमांनी रसिक दरबारी हजेरी लावली. ‘दोस्ती के साइड इफेक्ट्स’, ‘द फकीर आॅफ व्हेनिस’, ‘एसपी चौहान’, ‘पार्किंग क्लोज’, ‘झोल’, ‘खंडाला नाईट’ आणि ‘एंड काऊंटर’ हे सिनेमे गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झाले. ‘अलिता : बँटल एंजेल’ डब सिनेमासोबत एकूण सहा ओरिजनल, दोन डब तमिळ चित्रपटांनी बाॅक्स आॅफिसवर हजेरी लावली. पाच तेलुगू ओरिजनल आणि तीन डब सिनेमेही प्रदर्शित झाले.


संख्या दुप्पट

‘प्रेम अमर २’ या सिनेमासोबत चार बंगाली, दोन मल्याळम, तर भोजपुरी, कन्नड, छात्तीसगडी, गुजराती, आसामी, ओरिया आणि कोरियन भाषेतील प्रत्येकी एक सिनेमा मागच्या शुक्रवारी प्रदर्शित झाला. या जोडीला तीन हाॅलिवूड सिनेमेही होतेच. प्रत्येक शुक्रवारी असंच काहीसं चित्र पाहायला मिळतं, पण इतर वेळी हा आकडा २०-२५च्या आसपास असतो, मागच्या आठवड्यात मात्र हा दुप्पट झाला होता. यामागे मराठी सिनेमांचा फार मोठा वाटा होता.


पैसे व मेहनतीचा अपव्यय

हे चित्र पाहिल्यावर एकीकडे भारतीय सिनेमा वाढत असल्याचं निदर्शनास येत असलं, तरी व्यावसायिक दृष्टिकोनातून हे गणित नक्कीच फायदेशीर नाही. सिनेमागृहांची संख्या आणि प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांचा आकडा यांत योग्य ताळमेळ नसेल, तर वाद-विवाद होणं सहाजिक आहे. प्रचंड मेहनतीने बनवलेला सिनेमा जर प्रेक्षकांपर्यंत पोहोचलाच नाही, तर पैसे आणि मेहनत या दोघांचा अपव्यय होतो हे वेगळंच.


तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार

चित्रपट व्यवसायतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार निर्मात्यांनी योग्य विचारविनिमय करून सिनेमांच्या प्रदर्शनाच्या योजना आखणं गरजेचं आहे. मागील काही दिवसांपासून मराठी सिनेमांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने भविष्यात अशा प्रकारचं चित्र वारंवार पाहायला मिळण्याची शक्यता आहे. दर वर्षाच्या तुलनेत यंदा मराठी सिनेमांच्या संख्येत लक्षणीय वाढ होणार असल्याचे संकेत मिळत असल्यानं नवीन निर्मात्यांनी सिनेसृष्टीकडे केवळ हौस म्हणून न वळता नफ्या-तोट्याची गणितं डोक्यात ठेवून मैदानात उतरायला हवं. केवळ मराठी चित्रपटांचा आकडा वाढता कामा नये, तर त्यातील फायद्याचा ग्राफही उंचावण्याची गरज आहे. यावर एकत्रितपणे सिनेमा तयार करून प्रदर्शित करणं हा उत्तम उपाय आहे. यासाठी निर्माते-दिग्दर्शक यांच्यातील ताळमेळीसोबतच दुसऱ्या सिनेमांच्या निर्मात्यांसोबतही समन्वय साधून तोडगा काढणं भविष्याच्या दृष्टिकोनातून फायदेशील ठरणार आहे.हेही वाचा -

...आणि धोनीनं राखला तिरंग्याचा मान!

शिमग्याला सिनेमागृहांमध्ये नाचणार कोकणातील 'पालखी'!संबंधित विषय
ताज्या बातम्या