Advertisement

शिमग्याला सिनेमागृहांमध्ये नाचणार कोकणातील 'पालखी'!

गणेशोत्सवाप्रमाणेच शिमगा हा देखील कोकणवासीयांचा जीवाभावाचा सण. यंदा कोकणातील हाच शिमगा सिनेमागृहांमध्ये पाहायला मिळणार आहे.

शिमग्याला सिनेमागृहांमध्ये नाचणार कोकणातील 'पालखी'!
SHARES

शिमगा म्हणजे काय? हे कोकणातील माणसाला सांगण्याची गरज नाही. गणेशोत्सवाप्रमाणेच शिमगा हा देखील कोकणवासीयांचा जीवाभावाचा सण. यंदा कोकणातील हाच शिमगा सिनेमागृहांमध्ये पाहायला मिळणार आहे.


यंदाचा शिमगा सिनेमागृहात

मकर संक्रांती झाली की सर्व कोकणवासीयांना वेध लागतात होळी-शिमग्याचे... शिमगोत्सव मुख्यत: कोकणात खूप धुमधडाक्यात साजरा केला जातो. माडाची होळी उभी केल्यावर दुसऱ्या दिवशी देवाला रूपं लावली जातात. त्यानंतर पुढील काही दिवस देव-भक्ताचं अनोखं नातं पाहायला मिळतं. वर्षभर भक्तांची वाट पाहणारा देव शिमगोत्सवात घरोघरी जाऊन आपल्या भक्तांना दर्शन देतो. भक्त मोठ्या श्रद्धेने देवी-देवतांच्या पालख्या हातात, खांद्यावर, डोक्यावर, पाठीवर घेऊन नाचवतात. यंदाच्या शिमग्याला प्रेक्षकांना सिनेमागृहांमध्ये पालखी नाचवल्याचं पाहायला मिळणार आहे.


'शिमगा'ची आतुरतेनं वाट

'मारूया बोंबा करूया दंगा' असं म्हणत १५ मार्चला 'शिमगा' हा मराठी सिनेमा प्रदर्शित होणार आहे. कोकणातील 'शिमगा' हा सण प्रत्येक कोकणी माणसासोबतच मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांचा आणि चाकरमान्यांचा जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. होळी या सणाला कोकणात 'शिमगा' म्हणतात. वर्षभर महाराष्ट्रातील सर्व चाकरमानी, मानकरी लोक या सणाची आतुरतेनं वाट पाहत असतात.पालखीसाठी देशविदेशातील पाहुणे

कोकणात होळी हा सण साजरी करण्याच्या अनेक वेगवेगळ्या पद्धती आणि परंपरा आहेत. यात एक महत्त्वाची परंपरा आहे आणि ती म्हणजे 'उत्सवाची पालखी'. होळी सणात गावाच्या ग्रामदेवतेची पारंपरिक वाद्य वाजवून पालखी काढली जाते आणि ती नाचवली जाते. या पालखीत देव देवळातून पालखीत विराजमान होतात आणि भक्तांना दर्शन द्यायला निघतात. अतिशय प्रसिद्ध असलेला हा पालखीचा अभूतपूर्ण सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी देशविदेशातून लोक कोकणात येतात. सीमेवर देशाचं रक्षण करणारे आपले जवानही आपल्या गावची पालखी नाचवायला आवर्जून कोकणात येतात.


शिमागाचा टिझर रिलिज

शीर्षकावरून तरी 'शिमगा' या चित्रपटात या सणाचं विस्तृतपणे चित्रण करण्यात आलं असल्याची चाहूल लागते. नुकताच या चित्रपटाचा टिझर रिलिज करण्यात आला आहे. राजेश शृंगारपुरे आणि भूषण प्रधान हे जोशात आणि आनंदात ग्रामदेवतेच्या मंदिरासमोर पालखी नाचवताना टिझरमध्ये दिसतात. एका मंदिरासमोर हे दोघे पालखी नाचवत आहेत. त्यातच राजेश शृंगारपुरेचा भारदस्त आवाज कानी येतो, 'माणसाच्या लढाईत देवाला मध्ये आणू नको, श्रद्धेला बाजारात बसवू नको', असं सांगतो. हा चित्रपट नक्की कशावर आधारित आहे हे चित्रपटाचा विषय ट्रेलर आल्यावरच कळेल.


राजेश-भूषण आमनेसामने!

मूळचे कोकणचे असणारे निलेश पालांडे ऊर्फ निलेश कृष्णा यांनी या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात राजेश शृंगारपुरे, भूषण प्रधान आणि कमलेश सावंत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. गुरु ठाकूर आणि वलय यांनी लिहिलेल्या आणि पंकज पडघन यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतरचना या सिनेमात आहेत. होळीच्या पूर्वी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.हेही वाचा -

पश्चिम रेल्वेसाठी २८१५ सीसीटीव्ही कॅमेरे मंजूर

व्हॅलेंटाईन डेला तरी बोलेल का सलीलचा 'पक्या'?संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा