अकरावीच्या विशेष फेरीचं वेळापत्रक लवकरच - शिक्षण उपसंचालक

अकरावीसाठी ऑनलाइन प्रवेशाची चौथी यादी मंगळवारी ७ ऑगस्टला जाहीर झाली. आतापर्यंत चार याद्या जाहीर होऊनही काही विद्यार्थ्यांचे एकाही यादीत नाव न आल्यानं संतप्त विद्यार्थी आणि पालकांनी मंगळवारी चर्नी रोडजवळच्या शालेय शिक्षण उपसंचालक कार्यालयात धडक दिली. आतापर्यंत तब्बल ३२ हजार विद्यार्थी प्रवेशपासून वंचित राहिले असून या सर्व विद्यार्थ्यांसाठीच्या विशेष फेरीचं वेळपत्रक येत्या दोन दिवसांत जाहीर करण्यात येईल, असं मत शिक्षण उपसंचालकांनी व्यक्त केलं.

इतके विद्यार्थी प्रवेशापासून वंचित

अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडावी तसंच विद्यार्थ्यांना होणारा त्रास कमी व्हावा, या दृष्टीने गेल्या पाच सहा वर्षांपासून अकरावी प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन करण्यात येत आहे. मात्र, ही प्रक्रिया यावर्षी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मंगळवारी सकाळी चौथी यादी जाहीर झाली. मात्र, काही कॉलेजांमधील कट ऑफ वधारल्यामुळे या यादीतही अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. चौथ्या यादीसाठी एकूण ८१ हजार ६३ विद्यार्थ्यांनी अर्ज केले असून त्यापैकी फक्त ४९ हजार ६२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले. तर तब्बल ३२ हजार ००१ विद्यार्थ्यांना अद्याप कुठेही प्रवेश मिळालेला नाही. यामुळेच या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी मंगळवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयात धाव घेतली.

संप सुरू असताना...

७ ऑगस्टला मंगळवारी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असतानाही चर्नी रोड येथील शालेय शिक्षण विभागातील काही कर्मचाऱ्यांनी सकाळी कार्यालयात हजेरी लावली. मात्र त्यानंतर सर्वांनी एकमताने संपात सहभागी व्हायचं असं ठरवल्याने कार्यालयात आलेले सर्व कर्मचारी त्यांच्या घरी निघून गेले. यांच्यात 'सर्व शिक्षा अभियानां'तर्गत नेमणूक करण्यात आलेले आणि अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा दांडगा अनुभव असलेले अधिकारी अविनाश रणदिवे हे देखील होते.

मात्र त्यांनी संपात सहभागी होण्यास नकार देत, सकाळपासून उपसंचालक कार्यालयात रांगा लावलेल्या पालकांना उत्तर देणं आणि विद्यार्थ्यांच्या शंकांचं समाधान करणं हे माझं कर्तव्य आहे, असं सांगत त्यांनी कार्यालयातून बाहेर पडण्यास नकार दिला.

पालकांच्या शंकेचं समाधान

आधीच यादीत नाव न आल्यानं संतप्त झालेल्या विद्यर्थी आणि पालकांना राग अनावर झाला होता. त्यामुळे या सर्वांना शांत करण्यासाठी रणदिवे पोलिसांच्या मदतीने घोळक्यात गेले आणि त्यांनी पालकांच्या शंकांचंही समाधान केलं. यावेळी त्यांना शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांचीही साथ लाभली.

कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, असं शिक्षण उपसंचालक अहिरे यांनी सांगितलं. तसंच प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी आयोजित केली जाणार असून, लवकरच त्याबाबत सविस्तर माहिती जाहीर करण्यात येईल. प्रवेश न मिळालेलया सर्व विद्यार्थ्यांनी अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या वेबसाइटवर वेळोवेळी भेट द्यावी, असं आवाहन अहिरे यांनी केलं.


हेही वाचा -

अकरावीच्या चौथ्या गुणवत्ता यादीचा कटऑफ 'जैसे थे'

पुढील बातमी
इतर बातम्या