सायन्स एक्सप्रेसमध्ये होईल तुमची विज्ञानाशी दोस्ती!

  • पूजा वनारसे & मुंबई लाइव्ह टीम
  • शिक्षण

विज्ञान...शाळेत असतानाच काय, पण एरवीही या विषयाची प्रचंड भीती लोकांमध्ये असते. आणि यामध्ये फक्त शाळकरी मुलंच नसून कॉलेजमधली मुलं आणि मोठी माणसंही असतात बरं का! विज्ञानाचे फॉर्म्युले, रसायनं, क्लिष्ट नावं आणि त्यांचे परिणाम..हे सगळं लक्षात ठेवायचं म्हणजे कोण मेहनत! पण यावर एक धमाल आणि इंटरेस्टिंग उत्तर केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागानं शोधून काढलं आहे. ते उत्तर म्हणजे सायन्स एक्सप्रेस!

एका 16 डब्यांच्या रेल्वेमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित वेगवेगळ्या अनोख्या आणि क्लिष्ट गोष्टी अगदी सोप्या पद्धतीने दाखवण्यात आल्या आहेत. ही रेल्वे गेल्या 10 वर्षांपासून म्हणजे 2007पासून दरवर्षी देशभर भ्रमण करते. आत्तापर्यंत तब्बल 12 वेळा या सायन्स एक्सप्रेसची नोंद लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे.

सायन्स एक्सप्रेसचा प्रवास

  • 2007पासून दौऱ्यांना सुरुवात
  • देशभरात आत्तापर्यंत 8 दौरे
  • 1 लाख 56 हजार किलोमीटरचा प्रवास
  • देशातल्या एकूण 510 स्टेशन्सला भेट
  • एकूण 1750 दिवसांचं विज्ञान प्रदर्शन
  • 1 कोटी 70 लाख विज्ञानप्रेमींनी दिली भेट

बुधवारी ही सायन्स एक्सप्रेस मुंबईत दाखल झाली. 19 जुलै ते 22 जुलै या काळात ही सायन्स एक्सप्रेस मुंबईकरांसाठी सीएसटीएम स्थानकावर मुक्कामाला आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सीएसटीएम स्थानकामध्ये या एक्सप्रेसचं उद्घाटन केलं. सुमारे पावणेदोन कोटी दर्शक लाभल्यामुळे सायन्स एक्सप्रेस हे सर्वाधिक दर्शक लाभलेले प्रदर्शन ठरले आहे.

विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाबद्दल आवड निर्माण व्हावी, त्यांच्यापर्यंत ही माहिती साध्या-सोप्या पद्धतीने पोहोचावी यासाठी ही कल्पना राबवण्यात आली आहे. यंदाच्या सायन्स एक्सप्रेसमधून जागतिक तापमान वाढ आणि त्याअनुषंगाने उभी राहिलेली विविध आव्हाने याविषयी जनजागृती करण्याचा आला आहे.

प्रत्येक दौऱ्याचं विशेष

पहिल्या चार दौऱ्यांमध्ये सायन्स एक्सप्रेसने जगभरातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीची दखल घेतली. तर त्यापुढील तीन पर्वांमध्ये भारतातील समृध्द जैवविविधतेचा मागोवा घेणारे प्रदर्शन राबवण्यात आले. तर यंदाचे आठवे पर्व हे जागतिक तापमान वाढ आणि संबंधित आव्हानांना दर्शविणारे आहे, जे 'सायन्स एक्सप्रेस जलवायू परिवर्तन विशेष' या नावाने प्रदर्शित केले गेले.

असं म्हणतात की सोप्या आणि कळेल अशा शब्दांत शिकवलं तर कोणताही विषय अवघड नाही. सायन्स एक्सप्रेसच्या माध्यमातून विज्ञान, तंत्रज्ञान यासारखे अवघड वाटणारे विषय आणि त्यातल्या क्लिष्ट संकल्पना अगदी सोप्या पद्धतीने मांडण्यात आल्या आहेत. कदाचित शिक्षण क्षेत्रातला हा सर्वात अनोखा प्रयोग असावा!

प्रदर्शनाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी www.sciencexpress.in या लिंकवर क्लिक करा.


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या