पाच वर्षांत 40 हजार रेल्वे डबे सुरक्षित करणार - सुरेश प्रभू

 Mumbai
पाच वर्षांत 40 हजार रेल्वे डबे सुरक्षित करणार - सुरेश प्रभू
Mumbai  -  

भारतीय रेल्वेला अनेक वर्षांचा ‘बॅकलॉग’ असल्याने देशातील 40 हजारपेक्षा जास्त रेल्वे डब्यात सुरक्षिततेचा अभाव आहे. तीन वर्षांत बॅकलॉग भरणे शक्य नाही. मात्र आगामी पाच वर्षांत 40 हजार डबे आधुनिक तंत्रज्ञानाने प्रवासी सुरक्षिततेसह सेवेत आणणार असल्याची घोषणा सुरेश प्रभू यांनी सोमवारी केली. प्रवासी सुरक्षिततेसाठी रेल्वेने एक लाख कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले.मुंबईतील स्थानकांत 34 हजार बायोटॉयलेट आणि सर्व एक्स्प्रेसमध्ये बायोव्हॅक्यूम टॉयलेट बसवण्यात येणार आहेत. 2019 पर्यंत मुंबईची विकासकामे पूर्ण होणार आहेत. शिवाय 150 दिव्यांग शौचालय, सद्यस्थितीत शंभराहून अधिक स्थानकांत मोफत वाय-फाय सेवेचा प्रवासी लाभ घेत आहेत. आगामी पाच वर्षांत 400 स्थानकांवर मोफत वायफाय सुविधा पुरवण्यात येणार असून, ही विकासकामे करताना स्वच्छता हीच रेल्वेची प्राथमिकता असणार असल्याचे प्रभूंनी स्पष्ट केले. सोमवारी दादर येथे मध्य आणि हार्बर स्थानकांतील प्रवासी सेवेचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

उपनगरीय रेल्वे स्थानकावरील सोयी सुविधांचं उद्घाटन

मरेच्या दादर, कुर्ला, ठाकूर्ली, कल्याण आणि हार्बरच्या रे रोड, डॉकयार्ड रोड, मानखुर्द, चेंबूर या स्थानकांतील प्रवासी सुविधांचे उद्घाटन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सीएसटी येथे रुफ टॉप सौर ऊर्जा प्रकल्पांचाही यात समावेश आहे.

मध्य रेल्वे आणि मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या (एमआरव्हीसी) वतीने स्थानकांतील प्रवासी सुविधांची कामे वेगाने पूर्ण करण्यात आली आहेत. मान्सूनमध्ये प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी मरेकडून विशेष प्रयत्न करण्यात आले. अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर करुन वीज बचत करण्यासाठी मरेने सीएसटी येथे रुफटॉप सौर ऊर्जा प्रकल्प राबवला आहे. मध्य, पश्चिम आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे दादर स्थानकांतील जिन्यांवर प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. ही गर्दी कमी करण्यासाठी पूर्व-पश्चिम दिशेसह मध्य आणि पश्चिम मार्गांना जोडणाऱ्या पदपथाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. स्कायवॉक आणि टिळक पुलाला जोडणारे पादचारी पूल आणि सरकते जिने या प्रवासी सुविधांचे उद्घाटन प्रभूंच्या हस्ते होणार आहे. दादरसह कुर्ला, ठाकूर्ली, कल्याण आणि हार्बरवरील रे रोड, डॉकयार्ड रोड, मानखुर्द, चेंबूर, कॉटन ग्रीन, वडाळा रोड या स्थानकांवर देखील सुविधांचे उद्घाटन होणार आहे.

Loading Comments