कवितेत अश्लील मजकूर, महिला आयोगाची कवी दिनकर मनवर यांना नोटीस


मुंबई विद्यापीठाच्या कला शाखेच्या तृतीय वर्ष अभ्यासक्रमात सामाविष्ट करण्यात आलेल्या कवितेमध्ये आदिवासी महिलांबद्दल अश्लील मजकूर वापरण्यात आला होता. याबाबत काही विद्यार्थी संघटनांनी नाराजी व्यक्त करत विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार दाखल केली होती. या सर्व तक्रारीची दखल घेत राज्य महिला आयोगाने कवी दिनकर मनवर यांना नोटीस बजावली असून त्यांना २० ऑक्टोबरला कार्यालयात उपस्थित राहून आपलं म्हणणं आयोगासमोर मांडण्यास सांगितलं आहे.

नेमकं प्रकरणं काय?

कला शाखेच्या तृतीय वर्ष अभ्यासक्रमात दीनकर मनवर यांच्या 'दृश्य नसलेल्या दृश्यात' हा कवितासंग्रह आहे. या कवितासंग्रहातील पान क्रं १२ व १३ वरील 'पाणी कसं असतं' या कवितेत पाण्याचं वर्णन आदिवासी महिलेच्या शरीराशी करण्यात आलं आहे. ही बाब आक्षेपार्ह असून विद्यापीठानं ही कविता नेमकी कोणता विचार करून अभ्यासक्रमात घेतली, याचा खुलासा करावा. अशी मागणी अनेक विद्यार्थी संघटनांनी केली होती.

अभ्यासक्रमातून वगळली

त्यानंतर विद्यापीठानं २९ सप्टेंबर रोजी एका परिपत्रकाद्वारे 'पाणी कसं असतं' ही कविता अभ्यासक्रमातून वगळण्यात आली असून या कवितेबाबत अध्यापन केलं जाणार नाही. तसंच यावरील कोणतेही प्रश्न परीक्षेत विचारले जाणार नाही, असा खुलासा मुंबई विद्यापीठाद्वारे करण्यात आला होता.

तक्रारीवर म्हणणं काय?

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे विविध संघटनांनी धाव घेत याबाबत तक्रार दाखल केली होती. या सर्व तक्रारींची नोंद घेत अखेर राज्य महिला आयोगानं दिनकर मनवर यांना नोटीस बजावली आहे. तसंच येत्या २० तारखेला त्यांनी स्वत: उपस्थित राहून या तक्रारीवरील आपलं म्हणणं आयोगासमोर मांडावं, असे आदेश दिले आहे.

त्याशिवाय ही कविता अभ्यासक्रमात समावेश करण्यामागे मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रम समितीची भूमिका स्पष्ट करण्याचा अहवाल महिला आयोगांने १९ ऑक्टोबर रोजी सादर करण्यास सांगितलं आहे.

हेही वाचा-

कला शाखेच्या अभ्यासक्रमात अश्लील मजकूर

विद्यार्थ्यांनो, आता फी भरा कधीही - यूजीसी


पुढील बातमी
इतर बातम्या