सिनेट सदस्यांच्या मागण्यांकडे कुलगुरूंचा कानाडोळा- युवासेना

एका बाजूला मुंबई विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांच्या कोणत्याही समस्याबाबत ठोस निर्णय घेतला जात नाही. तर दुसऱ्या बाजूला सिनेट सदस्यांच्या मागण्यांकडे कुलगुरू सुहास पेडणेकर कानाडोळा करत असल्याचा आरोप करत युवासेनेने कुलगुरूंच्या दालनात आंदोलन केलं.

दालनात आंदोलन

मुंबई विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध समस्याबाबत सिनेट सदस्यांनी वेळोवेळी पत्र लिहून तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र कुलगुरूंकडून यातील एकाही पत्राची दखल घेण्यात आली नाही, असं म्हणत युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोलंबकर, शशिकांत झोरे, प्रवीण पाटकर,शीतल शेठ-देवरुखकर, निखिल जाधव, सुप्रिया करंडे, मिलिंद साटम, वैभव थोरात व कार्यकारिणी सदस्य साईनाथ दुर्गे यांनी त्यांच्या दालनात आंदोलन केलं.

'या' मागण्या मान्य

या आंदोलनाची दखल घेत कुलगुरूंनी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी नोंदणीकृत पदवीधर सिनेट सदस्यांसोबत बैठक घेण्याचं मान्य केलं आहे. त्यानुसार १४ डिसेबर रोजी कुलगुरूंसोबतच्या आढावा बैठकीत सिनेट सदस्य आपल्या मागण्यांचा आराखडा देणार आहेत. त्याशिवाय सिनेट सदस्यांनी पाठवलेल्या पत्रांचं उत्तरही दिरंगाई न करता देण्यात येईल, असं आश्वासन यावेळी कुलगुरूंनी दिलं.

कलिना कॅम्पस, ठाणे उपकेंद्र, कल्याण उपकेंद्र, रत्नागिरी उपकेंद्र या विद्यापीठाच्या उपकेंद्रातील विद्यार्थ्यांना मार्कशीट मिळेपर्यंत सेटअप उभारण्यात येईल. तसंच प्रत्येक उपकेंद्रातील विस्तारिकरणाचं काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी सिनेट सदस्यांची प्रत्येक समितीत नेमणूक करून त्याबाबतचा अहवाल प्रत्येक महिन्याला देण्यात येईल.

कलिना कॅम्पसमधील वायफाय व सीसीटीव्ही बसवण्याचा आराखडा १४ डिसेंबरच्या बैठकीत सादर होईल. मादाम कामा हॉस्टेल फी बाबत निर्णय घेण्यासाठी महिला सिनेट सदस्यांची नेमणूक करण्यात येईल. इ. मागण्या लेखी स्वरूपात मान्य करून घेण्यात आल्या.


हेही वाचा-

पाटकर, खालसा काॅलेजांना स्वायत्तता

मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्रासाठी पालिकेकडून २० कोटींचा निधी


पुढील बातमी
इतर बातम्या