सोनू सूदच्या घरात आयकर विभागाची २० तास झाडाझडती

बॉलीवूड अभिनेत सोनू सूद याच्या घर आणि कार्यालयावर बुधवारी आयकर विभागानं सर्वेक्षण केलं होतं. त्यानंतर तब्बल २० तास सोनू सूदच्या घरी झाडाझडती सुरू होती. अखेर गुरुवारी पहाटेच्या सुमारास आयकर विभागाचे अधिकारी एक-एक करुन घरातून बाहेर पडले.

आयकर विभागानं बुधवारी सकाळी सहा वाजल्यापासून सोनू सूद याच्या निवासस्थान, कार्यालय आणि हॉटेलवर छापे टाकायला सुरुवात केली होती. त्यापैकी घरातील झाडाझडतीची मोहीम तब्बल २० तास सुरू होती. यावेळी घरात सोनू सूद, त्याचे कुटुंबीय आणि संपूर्ण कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

आयकर विभागाचे अधिकारी गुरुवारी पहाटे सोनू सूदच्या घरातून बाहेर पडले तेव्हा त्यांच्या हातात काही फाईल्स होत्या.

आयकर विभागाच्या या कारवाईनंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. अनेकांनी ही पाहणी नसून छापा असल्याचं म्हटलं आहे. तर यावर काहींनी नाराजी व्यक्त करत भाजपावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

सोनू सूदची नुकतीच दिल्ली सरकारच्या शाळकरी विद्यार्थीसाठीच्या अभियानासाठी ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतरच काही दिवसांतच आयकर विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे, अशी चर्चा देखील जोर धरत आहे.

दिल्ली कार्यक्रमात सोनू सूदला राजकारणात प्रवेश करण्याच्या दृष्टीनं भेट झाल्यासंबंधी विचारण्यात आलं होतं. तेव्हा त्यानं आपण राजकारणात प्रवेश करणार नसल्याचं सांगितलं होतं. आम आदमी पक्षातील नेत्यांच्या भेटीनंतर सोनू सूद राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती.

दरम्यान, सोनू सूदनं आम आदमी पार्टीमध्ये सामील होत नसल्याचं स्पष्ट केलं. पण तरी आयकर सर्वेक्षणात अरविंद केजरीवाल यांनी सोनू सूदला पाठिंबा दिला आहे. सूदच्या समर्थनार्थ ट्विट करत ते म्हणाले की, 'सत्याच्या मार्गावर लाखो अडचणी आहेत, पण सत्याचा नेहमीच विजय होतो. सोनू जी सोबत, भारताच्या लाखो कुटुंबांच्या प्रार्थना आहेत, ज्यांना कठीण काळात सोनू जीची साथ मिळाली.

गेल्यावर्षी देशात कोरोनाच्या साथीमुळे लॉकडाऊन लागलं तेव्हा सोनू सूद गरिबांचा मसिहा म्हणून उदयाला आला होता. लॉकडाऊनमुळे रेल्वे आणि प्रवासाची इतर सार्वजनिक साधनं बंद झाल्यानं अनेक मजूर मुंबईत अडकून पडले होते. त्यावेळी सोनू सूद यानं स्वखर्चानं या सर्व मजूरांसाठी विशेष बसची सोय केली होती. त्यामुळे सोनू सूद प्रचंड चर्चेत आला होता.

caknowledge.com नुसार सोनू सूदकडे एकूण १३० कोटींची संपत्ती आहे. सोनू सूद गेल्या २ दशकांपासून बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करत आहे. ज्यामुळे त्याची फॅन फॉलोईंग खूप जबरदस्त आहे.

ब्रँड अ‍ॅन्डॉर्समेंट ही त्याच्या उत्पन्नाचा एक प्रमुख स्त्रोत आहे. त्याने सलमान खानसोबत ‘दबंग’ या चित्रपटामध्येही काम केलं आहे. त्याचवेळी शाहरुख खानसोबत ‘हॅपी न्यू इयर’ मध्ये काम केलं होतं.

सोनू सूद मुंबईतील लोखंडवाला भागात 2600 चौरस फुटांच्या घरात राहतो. सोनूचे हे घर जवळपास ४ बीएचके आहे. यासह सोनूचे मुंबईत आणखी दोन फ्लॅट आहेत. त्याच वेळी, त्याचे जुहूमध्ये एक हॉटेल देखील आहे. याशिवाय सोनूचे मुंबईतही काही कॉफी पॉईंट्स आहेत.


हेही वाचा

अभिनेता सोनू सूदच्या मुंबईतील कार्यालयांवर आयकर विभागाचे सर्वेक्षण

दीपिका पदुकोण आशियातील सर्वात प्रभावशाली महिला

पुढील बातमी
इतर बातम्या