हा मराठी कलाकारही करतोय डिजिटल विश्वात पदार्पण

आज सर्वांनाच डिजिटल विश्वाचे वेध लागले आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीपासून मराठी सिनेजगतापर्यंतचे सर्वच आघाडीचे कलाकार आज वेब सिरीजमध्ये झळकत आहेत. अशातच संजय नार्वेकरही वेब सिरीजमध्ये दिसणार असल्याची बातमी आली आहे.

मराठी रंगभूमीपासून मराठी सिनेसृष्टी आणि हिंदी सिनेविश्वापर्यंतचा संजय नार्वेकरचा प्रवास वाखाणण्याजोगा आहे. ‘अगं बाई अरेच्चा’, ‘खबरदार’, ‘येरे येरे पैसा’ हे मराठी आणि ‘वास्तव’सारख्या बऱ्याच हिंदी सिनेमातून दिसलेला संजय नार्वेकर आपल्या खास शैलीसाठी प्रेक्षकांमध्ये प्रचलित आहे. आजवर सिनेमा आणि नाटकात संजयनं खूप वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. कॅफे मराठी आणि शिवाय इंटरनॅशनल प्रस्तुत, अभिषेक पारीख, निखिल रायबोले आणि भूपेंद्रकुमार नंदन निर्मित एका आगामी मराठी वेब सिरीजमधून संजय पहिल्यांदाच वेब सिरीजमध्ये झळकणार आहे. या वेब सिरीजचं दिग्दर्शन प्रवीण राजा कारळे यांनी केलं आहे.

संजयच्या पहिल्या वहिल्या वेब सिरीजमध्ये त्याच्या जोडीला स्मिता शेवाळे, विनय येडेकर, विजय गोखले, सुनील होळकर आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. क्रिकेट हा आज भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. आयपीएल आणि २०-२० सामन्यांमुळं या खेळाच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढच होत आहे. त्यामुळंच या खेळात करियर घडवण्याचं स्वप्न अनेक तरुण-तरुणी पहात असतात. संजयच्या पहिल्या वेब सिरीजचा विषयही याच खेळाभोवती फिरतो. या वेब सिरीजमध्ये संजय आजवर कधीही न दिसलेल्या एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी अर्थात त्याला थोडा अभ्यास करावा लागला, परंतु बालपण मुंबईत गेल्यानं त्याला फारसे कष्ट लागले नाहीत.

आपल्या या नव्या इनिंग्जबाबत संजय म्हणाल की, या वेब सिरीजच्या रूपानं मी डिजिटल विश्वात पदार्पण करत आहे. कॅफे मराठी टीमनं जेव्हा मला ही गोष्ट ऐकवली, तेव्हाच ती आवडली होती. आदित्य गावडे आणि अनुपम पुरोहित यांनी ही गोष्ट छान फुलवलं आहे. त्यामुळं मलाही या वेब सिरीजमध्ये काम करतांना खूप मज्जा आली. नाटक, सिनेमा नंतर सर्वात वेगानं वाढणाऱ्या डिजिटल माध्यमात काम करायला मिळाल्याचा मला आनंद आहे.


हेही वाचा -

ही अभिनेत्री बनली लेखिका

स्टार चमकले आणि जिम ट्रेनर बनला पडद्यावरचा स्टार


पुढील बातमी
इतर बातम्या