Advertisement

ही अभिनेत्री बनली लेखिका

आजवर बऱ्याच अभिनेत्रींनी लेखन क्षेत्रातही आपलं नशीब आजमावत लेखनाची आपली हौस भागवली आहे. याच अभिनेत्रींच्या पावलावर पाऊल ठेवत मधुरा वेलणकरही लेखिका बनली आहे.

ही अभिनेत्री बनली लेखिका
SHARES

आजवर बऱ्याच अभिनेत्रींनी लेखन क्षेत्रातही आपलं नशीब आजमावत लेखनाची आपली हौस भागवली आहे. याच अभिनेत्रींच्या पावलावर पाऊल ठेवत मधुरा वेलणकरही लेखिका बनली आहे.

सध्या रंगभूमीवर गाजत असलेल्या ‘गुमनाम है कोई’ या नाटकात मधुरा एका लेखिकेच्या भूमिकेत नाट्यरसिकांचं लक्ष वेधून घेत आहे. यासोबतच वास्तवातही ती लेखिका बनल्याचं लवकरच तिच्या चाहत्यांना पहायला मिळणार आहे. सर्वसाधारणपणे ज्यांना वाचनाची अतोनात आवड असते तेच बऱ्याचदा आपल्या मनातील भावना शब्दरूपात काग्दावर उतरवत लेखक किंवा लेखिका बनतात, पण मधुराच्या बाबतीत हे समीकरण काहीसं अपवादात्मक असल्याचं म्हणायला हरकत नाही. तसं पाहिलं तर मधुराला वाचनाची फारशी आवड नाही, तरीही ती आता लेखिकेच्या रूपात रसिकांसमोर येणार आहे.

मधुराच्या म्हणण्यानुसार, लेखकानं स्वतः पाहिलेलं, अनुभवलेलं किंवा कल्पिलेलं असतं; ते जवळजवळ तसंच उभं करण्याची लेखकाची ताकद किती असू शकते हे ‘रारंगढांग’ या प्रभाकर पेंढारकरांच्या पुस्तकातून मला कळलं. सुरुवातीला वाचनाचीही फारशी आवड नसूनही झी दिशाचे विजय कुवळेकर यांच्या आग्रहाखातर स्वतःचे अनुभव ‘मधुरव’ या सदरातून मांडायला लागले आणि आता या लेखनप्रपंचात इतकी रमून गेले की, या सदरातील आणि इतर नियतकालिकांतील लेखांचं पुस्तकात रूपांतर होण्याच्या दिशेनं नकळत माझा प्रवास पोहोचला आहे.

चार राज्य पुरस्कारांची आणि इतर अनेक पुरस्कारांची मानकरी ठरलेली एक चतुरस्र अभिनेत्री म्हणून परिचित असलेल्या आणि नाट्य-चित्रपट-अभिनय शिबिरं-कार्यशाळा अशा नानाविध माध्यमांतून गेल्या दोन दशकांहून अधिक काळ अभिनयाच्या क्षेत्रात घोडदौड करणाऱ्या मधुरानं अगदी सहजच लेखनक्षेत्रातही पाऊल टाकलं आणि आता तिच्या पहिल्यावहिल्या पुस्तकाचं ‘मधुरवचं’ प्रकाशन तिच्या वाढदिवशीच मंगळवारी ८ ऑक्टोबरला विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर प्रसिद्ध नाटककार आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांच्या शुभहस्ते यशवंत नाट्य मंदिर येथे रात्री ८ वाजता होणार आहे. ‘रसिक आन्तरभारती’ या पुण्याच्या प्रकाशनाकडून प्रकाशित केल्या जाणाऱ्या या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याची सगळी सूत्रं पुष्कर श्रोत्री सांभाळणार आहे.

‘चला हवा येऊ द्या’ फेम श्रेया बुगडे आणि ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अनीता दाते या दोन अभिनेत्री ‘मधुरव’ पुस्तकातल्या निवडक अंशांचं अभिवाचन या प्रसंगी करणार आहेत. तसंच मधुरा वेलणकर-साटम यांचं कुटुंबीय आणि चित्रपट-नाट्य क्षेत्रातले अनेक दिग्गज कलाकार यांच्याशी गप्पांच्या माध्यमातून संवाद साधता येणार आहे. प्रकाशनानंतर प्रकाशनाच्या ठिकाणी आणि त्यानंतर सर्व पुस्तकविक्रेत्यांकडे आणि ऑनलाईन हे पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

दसऱ्याचं निमित्त साधून मधुराच्या लेखणीतून उतरलेलं हे अक्षरसोनं तिच्या चाहत्यांपर्यंत पोहोचणार आहे.हेही वाचा -

४० वर्षांनी रंगभूमीवर अवतरणार ‘हिमालयाची सावली’

धमाल ‘आप्पा आणि बाप्पा’ची
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा