Advertisement

४० वर्षांनी रंगभूमीवर अवतरणार ‘हिमालयाची सावली’


SHARES

१९७२ मध्ये प्रथमच रंगभूमीवर आलेलं प्रा. वसंत कानिटकर यांचं ‘हिमालयाची सावली’ हे नाटक पुन्हा नव्या संचात नाट्यरसिकांसमोर येत आहे. ज्येष्ठ अभिनेते डा. श्रीराम लागूंनी साकारलेल्या नानासाहेबांच्या व्यक्तिरेखेत नव्या संचातील नाटकात शरद पोंक्षे दिसणार आहेत.

एका व्रतस्थ समाज कार्यकर्त्याच्या पत्नीला कशाप्रकारे अवघं आयुष्य जगावं लागतं या आशयाचं हे नाटक जुन्या काळाची एक रम्य मुशाफिरी ठरणार आहे. तब्बल ४० वर्षांनी पुन्हा एकदा हे नाटक नाट्यरसिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. प्रकाश देसाई प्रतिष्ठान (पाली) व अद्भुत प्रॉडक्शन्स निर्मित व सुप्रिया प्रॉडक्शन्सची प्रस्तुती असलेल्या या नाटकाचे प्रस्तुतकर्ते गोविंद चव्हाण व प्रकाश देसाई आहेत.

दिग्दर्शन राजेश देशपांडे यांनी केलं आहे. प्रा. वसंत कानिटकर यांचा नातू अंशुमन कानेटकर यांच्या उपस्थितीत नुकतीच या नाटकाची घोषणा करण्यात आली आहे. या नाटकात पोंक्षेंच्या जोडीला श्रृजा प्रभूदेसाई, ओमकार कर्वे, कृष्णा राजशेखर, जयंत घाटे, विघ्नेश जोशी, कपिल रेडेकर, प्रकाश साबळे, मकरंद नवघरे, रुतुजा चीपडे, पंकज खामकर यांच्या भूमिका आहेत. राहुल रानडे यांनी या नाटकाला संगीत दिलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा