Advertisement

स्टार चमकले आणि जिम ट्रेनर बनला पडद्यावरचा स्टार

कुणाचं नशीब कधी फळफळेल आणि कुणाचे स्टार कधी चमकतील हे सांगता येत नाही. अशाच एका जिम ट्रेनरचे स्टार चमकले आणि तो थेट पडद्यावरचा स्टार बनला आहे.

स्टार चमकले आणि जिम ट्रेनर बनला पडद्यावरचा स्टार
SHARES

कुणाचं नशीब कधी फळफळेल आणि कुणाचे स्टार कधी चमकतील हे सांगता येत नाही. अशाच एका जीम ट्रेनरचे स्टार चमकले आणि तो थेट पडद्यावरचा स्टार बनला आहे.

मेहनतीला नशीबाची साथ लाभल्यानं गरुडभरारी घेत थेट आकाशाला गवसणी घालणाऱ्या अनेक व्यक्ती आपण आपल्या आजूबाजूला पहात असतो. फिल्म इंडस्ट्रीत असंच एक उदाहरण जगासमोर आलं आहे. तसं पाहिलं तर चंदेरी दुनियेत एक संधी मिळवण्यासाठी सर्वांनाच झगडावं लागतं, पण ज्यांना नशीबाची साथ लाभते तेच अल्पावधीत लाईमलाईटमध्ये येतात. असंच काहीसं ‘मिथुन’ या सिनेमाद्वारे रुपेरी पडद्यावर एंट्री करणाऱ्या आणि ‘साता जल्माच्या गाठी’ या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या विशाल निकमच्या बाबतीत घडलं आहे. मूळात जीम ट्रेनर असलेल्या विशालची ही गरुडझेप अनेकांना प्रेरणादायी ठरणारी आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवर नुकत्याच सुरू झालेल्या ‘साता जल्माच्या गाठी’ या मालिकेतील युवराज म्हणजेच विशाल निकमला सध्या प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. विशालचा अभिनयाचा प्रवास मात्र वाटतो तितका सोपा नाही. मुळचा सांगलीकर असणाऱ्या विशालला लहानपणापासूनच अभिनयाचं वेड होतं. त्याचे वडील शेतकरी असून, घरात कुणीही अभिनय क्षेत्रात नाही. अशा परिस्थीतीतही विशालनं आपला हट्ट सोडला नाही. मास्टर इन फिजिक्सची पदवी आणि सोबतीला अभिनयाचे धडे घेत असताना त्यानं स्वप्नांचा पाठलाग करत मुंबई गाठली.

अभिनय क्षेत्रात पाऊल कसं टाकावं याची माहिती मिळवण्यासाठी त्यानं मुंबईतल्या एका जिममध्ये पर्सनल ट्रेनर म्हणून कामाला सुरुवात केली. या जिममध्ये बरेच कलाकार येत असल्याची माहिती मिळाल्यामुळं त्यानं या जिमची निवड केली होती. मुंबईत कुणीच ओळखीचं नाही. लांबचे नातेवाईक कल्याणमध्ये रहात असत. कल्याण ते गोरेगाव असा रोजचा प्रवास करत विशाल पहाटे ६ ला जीम गाठायचा. जिमसोबतच जमेल त्याच्याकडून तो या क्षेत्राविषयीची माहिती मिळवत असे. अशातच त्याची ओळख मराठी इंडस्ट्रीतील दोन कलाकारांशी झाली. ओळखीतून आणि स्वत:च्या मेहनतीनं त्यानं मॅगझिनसाठी फोटोशूट आणि ऑडिशन द्यायला सुरुवात केली.

अनेक दिवसांच्या मेहनतीचं फळ अखेर विशालला मिळालं आणि त्याला ‘मिथुन’ सिनेमाची ऑफर मिळाली. सिनेमात साकारलेल्या भूमिकेच्या बळावर त्याला स्टार प्रवाहवरील ‘साता जल्माच्या गाठी’ या मालिकेत युवराज या मुख्य भूमिकेसाठी त्याला निवडण्यात आलं. अभिनय क्षेत्रात यायचं तर फिटनेसशिवाय पर्याय नाही याची जाणीव असल्यानेच शूटिंगच्या वेळा सांभाळत तो फिटनेसवरही तितकीच मेहनत घेतो. विशालची ही कहाणी सिनेमतील एखाद्या गोष्टीप्रमाणेच आहे.

अपल्या या प्रवासाबाबत विशाल म्हणाला की, मालिकेमुळं तुम्हाला तत्काळ प्रसिद्धी मिळते. पण ‘साता जल्माच्या गाठी’ या मालिकेमुळं माझे आई-बाबा खऱ्या अर्थानं सेलिब्रिटी झाले आहेत. आजवर मला मिळालेल्या यशाबद्दल त्यांना सार्थ अभिमान असल्याचंही विशालनं सांगितलं. अभिनयासोबतच डान्स, मार्शल आर्ट्स आणि तलवार बाजीचंही प्रशिक्षण विशालनं घेतलं आहे. क्रिकेटमध्येही तो पारंगत आहे. विशालच्या जिद्दीची ही कहाणी तमाम तरुणाईसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणारी आहे.हेही वाचा -

४० वर्षांनी रंगभूमीवर अवतरणार ‘हिमालयाची सावली’

धमाल ‘आप्पा आणि बाप्पा’ची
संबंधित विषय
Advertisement