आरोहीसारखीच मी देखील स्वावलंबी आहे - गौरी नलावडे

छोट्या पडद्यावर ‘सूर राहू दे’ ही नवी मालिका नुकतीच सुरू झाली आहे. दोन परस्पर भिन्न स्वभावाच्या व्यक्तींची प्रेमकथा या मालिकेत आहे. छोट्या पडद्यावर नावलौकिक मिळवल्यानंतर मोठ्या पडद्याकडे वळलेली अभिनेत्री गौरी नलावडे ‘सूर राहू दे’च्या निमित्ताने मालिका विश्वात पुनरागमन करत आहे. या मालिकेत गौरी साकारत असलेल्या आरोहीच्या जोडीला संग्राम साळवी आहे. या मालिकेविषयी संवाद साधताना गौरीने तीन वर्षांनी पुनरागमन करण्यामागील कारण सांगितलंच, पण त्याबरोबरच आरोही कशी आपल्यासारखीच आहे ते देखील सांगितलं.

तीन वर्षांनी पुनरागमन

तीन वर्षांनी मी पुन्हा मालिकांकडे वळले कारण एक ब्रेक घेतलासाठी  होता. पहिल्या मालिकेपासून आजवरच्या प्रवासात माझ्यात एक माणूस म्हणून आणि अभिनेत्री म्हणूनही खूप बदल झाला आहे. प्रेक्षक हा बदल ऑनस्क्रीन पाहताना अनुभवतील. त्यांच्या प्रतिक्रियांचं स्वागत असेल. माझ्या या नवीन भूमिकेत प्रेक्षकांना एक फ्रेशनेस जाणवेल. माझ्या आधीच्या भूमिकांमधील साधेपणा तसाच कायम आहे हे मात्र नक्की.

भूमिकेची निवड

मी एका वेगळ्या आणि चांगल्या भूमिकेची प्रतिक्षेत होते. मालिका करायची होतीच, पण मंदार देवस्थळी यांची कथा आवडल्याने होकार दिला. ही टिपिकल प्रेमकथा नसून, यात विभिन्न पैलू आहेत. मी आधी साकारलेल्या सर्व भूमिका स्वप्नाळू आणि खूप पटकन प्रेमात पडणाऱ्या आणि प्रेमावर विश्वास ठेवणाऱ्या मुलींच्या होत्या. पण ही तशी नाही. प्रेमात पडण्यासाठी हिच्याकडे वेळच नाही. तिचं प्रेम म्हणजे काम. जेव्हा मंदारसरांनी कथा आणि सहकलाकारांबाबत सांगितलं, तेव्हा चांगल्या टीमसोबत काम करायला मिळणार असल्याची जाणीव झाली.

आरोही आणि मी...

आरोही ही स्वावलंबी आणि तितकीच भावनिक व संवेदनशीलही आहे. वास्तवातही मी बहुतांशी तशीच आहे. मागील सहा ते सात वर्षे कामामुळे मी कुटुंबापासून दूर एकटी राहत आहे. त्यामुळे मीदेखील आरोहीसारखीच स्वावलंबी आहे. आम्हा दोघींमध्ये ही एक गोष्ट समान आहे. त्यामुळे ही व्यक्तिरेखा माझ्याशी खूप रिलेटेबल आहे. आरोहीची खानावळ आहे. बिझनेसप्रती तिचं असलेलं पॅशन मला हळूहळू सापडत आहे.

ऑफस्क्रीन बॉण्डिंग

संग्राम आणि मी आधीपासून एकमेकांना ओळखतो. माझी सर्वात जवळची मैत्रीण खुशबू तावडेचा तो पती आहे. त्यामुळे आमची ओळख होतीच. तसंच याआधी देखील आम्ही प्रमोशनल इव्हेंट्स आणि कार्यक्रमात भेटलो होतो. त्यामुळे आमची मैत्री तशी जुनीच आहे. ‘सूर राहू दे’मधील संग्रामची व्यक्तिरेखा खूपच वेगळी असल्याने आम्ही एन्जॅाय करत आहोत.

जेवण बनवण्याची आवड

या मालिकेत माझी खानावळ असल्याचं दाखवण्यात आलं आहे. वास्तवात कामानिमित्त एकटी राहत असल्याने जेवण बनवण्याची मला सवय आहे. मी फक्त शाकाहारी जेवण बनवते. जेवण बनवायची फार आवड नसली तरी माझ्या हातचे पदार्थ खाऊन खूपजण म्हणतात की, माझ्या हाताला आईच्या हाताची चव आहे. मला प्रसादाचा शिरा बनवायला खूप आवडतो. मी सर्वात पहिल्यांदा दालखिचडी बनवली होती आणि तो अनुभव भन्नाट होता.


हेही वाचा -

रोहित-हृषिकेश-आनंदीचा ‘चोरीचा मामला’!

आदिती द्रविड म्हणतेय ‘यू अँड मी'


 

पुढील बातमी
इतर बातम्या