‘मला आई व्हायचंय’ चित्रपटाचा हिंदी रिमेक

मराठी सिनेमांनी जगभरातील फिल्ममेकर्सना नेहमीच भुरळ घातली आहे. त्यामुळेच मराठी सिनेमांचे इतर भाषांमध्ये रिमेक होण्याचं प्रमाण वाढलं आहे. अॅड. समृद्धी पोरे यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘मला आई व्हायचंय’ या मराठी सिनेमाचाही हिंदी रिमेक पहायला मिळणार आहे.

पदार्पणातच पुरस्कार

पोरे यांनी २०११ मध्ये ‘मला आई व्हायचंय’ हा आपला पहिला चित्रपट बनवला. या चित्रपटाचा विषय होता ‘सरोगेशन’. ज्यावेळी या विषयावर जास्त बोललंही जात नव्हतं तेव्हा या विषयावर त्यांनी या चित्रपटाची कहाणी लिहिली. तसंच दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं व अशा विषयावर कुणीच निर्माता मिळत नसल्याने स्वत:च निर्मितीही केली. पदार्पणातच त्यांनी राष्ट्रीय पुरस्कार, राज्य पुरस्कार व आंतरराष्ट्रीय पुरस्कारसुध्दा पटकावले. आज मात्र आठ वर्षानंतर याच चित्रपटाचा हिंदीत रिमेक होत आहे.

हॉलीवूडमधल्या नायिका

एका गहन विषयावर आधारित असलेला ‘मला आई व्हायचंय’ हा सिनेमा निर्माता दिनेश विजान यांनी विमानात पाहिला आणि इतका सुंदर चित्रपट मराठीशिवाय इतर लोकांपर्यंत पोचला कसा नाही याबद्दल त्यांना खंत वाटली. त्यांना ही कहाणी ऑस्कर विजेता गास डेविसच्या ‘लायन’ या चित्रपटासारखी वाटली आणि बहुचर्चित ‘स्त्री’ या चित्रपटाचे दिग्दर्शक अमर कौशिक आणि निर्माता दिनेश विजान यांनी ‘मला आई व्हायचंय’ या मराठी सिनेमाचा हिंदी रिमेक बनवण्याची इच्छा जाहीर केली. त्यानुसार पोरे यांनी त्यांना कायदेशीर हिंदी रिमेकचे राईट दिले आहेत. यामधे हिंदी आणि हॉलीवूडमधल्या गाजलेल्या नायिका काम करणार आहेत. कथालेखन लेखन स्वतः पोरे करणार आहेत.

तेलगू रिमेक गाजला

याच चित्रपटाचे तेलगू रिमेक हक्क त्यांनी या आधीच दिले होते. त्यावर ‘वेलकम ओबामा’ हा तेलगू चित्रपट साऊथमध्ये गाजला आहे. एका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात साऊथचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक सिगींनतम श्रीनिवास राव यांनी हा चित्रपट बघितला होता आणि त्यांनी पोरे यांना तेलगू रिमेकसाठी मागणी केली. राव यांनी अनेक चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ‘पुष्पक’, ‘अप्पुराजा’ इत्यादी हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शनही त्यांनी केलं आहे.

हॉलीवूडमध्येही निमिर्ती

मराठी चित्रपटाला सर्व भाषांमधून अशी रिमेकची मागणी येणं ही अभिमानाची बाब आहे. पोरे यांनी इतर सर्व भाषांतले हक्क स्वतःकडेच ठेवले आहेत. हॉलीवूडमध्ये इंग्रजीतले हक्क देण्यासाठी त्यांची बोलणी चालू आहेत. हिंदी सिनेमाच्या कामाला सुरवात झाली आहे आणि लवकरच शूटिंगला सुरुवात होणार आहे.

हेमलकसा प्रदर्शनाच्या वाटेवर 

हायकोर्टात प्रॅक्टीस करणाऱ्या पोरेंकडे एक केस आली होती. प्रचंड भावनिक गुंतागुंत असलेल्या या केसचा विषय खूप महत्त्वाचा असून त्यावर चित्रपट होऊ शकतो हे त्यांनी जाणलं. त्यानंतर त्यांनी मोठ्या धाडसाने वकिली करत असतानाच ‘मला आई व्हायचंय’ या सिनेमाचं लेखन दिग्दर्शन निर्मितीही केली. समीक्षकांसह प्रेक्षकांनी गौरविलेल्या या चित्रपटाने अनेकांना भुरळ घातली. त्यानंतरच्या ‘डॉ प्रकाश बाबा आमटे’ या सामाजिक चित्रपटाने त्यांना प्रसिद्धी व पुरस्कार मिळवून दिले. आता त्यांचा ‘हेमलकसा’ हा हिंदी चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.

लवकरच चित्रीकरण

एखादी चांगली कलाकृती सर्वदूर पोहोचण्यासाठी योगायोग जुळून यावे लागतात. असेच योगायोग ‘मला आई व्हायचंय’ च्या बाबतीत जुळत गेले आणि आता या सिनेमासाठी हिंदीची कवाडं खुली झाली आहेत. या सिनेमाच्या हिंदी रिमेक बनण्याची कागदोपत्री कारवाई पूर्ण झाली असून लवकरच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.


हेही वाचा -

पृथ्वी थिएटरची चाळीशी!

डिजीटल जगतात अनुष्का बनली नंबर वन!


 

पुढील बातमी
इतर बातम्या