बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या पाली हिल इथल्या ऑफिसचे टाळे तोडून पालिकेनं सकाळी ११ वाजताच्या सुमारास कारवाई केली. पालिकेनं तिचे ऑफिस अवैध बांधकाम असल्याची २४ तासांत दुसरी नोटीस पाठवली होती. यावरून संतापलेल्या कंगनानं आणखी एक वादग्रस्त ट्विट केलं आहे.
पोलिस आणि महापालिका कर्मचाऱ्यांचे फोटो शेअर करत कंगनानं लिहलं आहे की ‘बाबर आणि त्याचे सैन्य’.
त्यानंतर तिनं आणखी एक ट्विट केलं. त्या तिनं मुंबईची तुलना पाकिस्तानशी केली आहे. तिनं ट्विटमध्ये लिहलं की, “मी कधीच चुकीची नव्हते. माझे शत्रू वारंवार सिद्ध करत असतात की, माझी मुंबई आता पीओके झाली आहे.”
कंगना एवढंच बोलून थांबली नाही. तर तिनं तिसरं ट्विट देखील केलं. या ट्विटमध्ये ती म्हणाली की, 'मणिकर्णिका फिल्म्जमध्ये पहिली फिल्म अयोध्याची घोषणा झाली, ही माझ्यासाठी एक इमारत नाही तर राम मंदिर आहे, आज येथे बाबर आला आहे. आज इतिहास पुन्हा एकदा पुनरावृत्ती करेल. राम मंदिर तोडले जाईल. पण लक्षात ठेव बाबर हे मंदिर पुन्हा बनवले जाईल, हे मंदिर पुन्हा बनवले जाईल. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम...'
कंगना रणौत ९ सप्टेंबरला म्हणजेच आज मुंबईत दाखल झाली. शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनाला सुनावलं होतं की, मुंबई असुरक्षित वाटत असेल तर तिनं पुन्हा इथं येऊ नये. याशिवाय शिवसेनेच्या एका नेत्यांनं कंगनानं मुंबईत पाऊल ठेवलं तर आमच्या रणरागिणी तिचं थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत, अशी धमकी दिली होती.
त्यावर कंगनानं ट्विट केलं होतं की, मी ९ सप्टेंबरला मुंबईत येते, कोणाच्या बापात हिम्मत आहे मला मुंबईत येण्यापासून रोखण्याची. यानंतर कंगनाला केंद्राकडून Y दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे.
सध्या कंगना मुंबईत दाखल झाली आहे. निघताना देखील तिनं एक ट्विट केलं होतं.
पालिका अधिकाऱ्यांनी बुधवारी (९ सप्टेंबर) सकाळी ११ वाजताच्या सुमारास टाळे तोडून तिच्या कार्यालयात प्रवेश केला. पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात ही कारवाई सुरु करण्यात आली. दरम्यान तिच्या मुंबईस्थित घराबाहेर देखील पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मुंबई मनपाच्या या कारवाईविरोधात कंगनानं मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. कंगनाच्या याचिकेवर थोड्याच वेळात सुनावणी होईल.
हेही वाचा