खुशखबर! लेखकालाही मिळणार सिनेमाच्या नफ्यातील १० टक्के वाटा

जागतिक पातळीवर नावलौकीक मिळवलेली मराठी सिनेसृष्टी हळूहळू सर्वांगाने वैश्विक सिनेमाच्या बरोबरीने वाटचाल करण्याच्या दिशेने पावलं टाकत आहे. केवळ सिनेमाच नव्हे, तर इतर गोष्टींच्या बाबतीत म्हणजे नफ्या-तोट्याच्या गणितातही मराठीत बरेच बदल घडत आहेत. आता लेखकांसाठी खुशखबर अशी आहे की मराठी सिनेमाच्या नफ्यातील १० टक्के वाटा त्यांना मिळणार आहे.

लेखक नेहमीच मागे

दिग्दर्शक सिनेमा तयार करतो, पण लेखक तो जन्माला घालत असतो. कागदावर उतरवलेला सिनेमा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम दिग्दर्शक आणि इतर मंडळी आपापल्या परीने करत असतात. या प्रक्रियेत सिनेमाच्या कथेचा जन्मदाता असलेला लेखक नेहमीच मागे राहिल्याचं आपण पाहतो. पण आता चित्र बदलणार आहे. लेखकालाही सिनेमाच्या नफ्यामध्ये १० टक्क्यांची भागीदारी मिळणार आहे.

शेक्सपियरच्या नाटकावर चित्रपट

‘नटसम्राट’ आणि ‘व्हॉट्सएप्प लग्न’ या यशस्वी सिनेमांची निर्मिती करणाऱ्या निर्माता-दिग्दर्शक विश्वास जोशी यांची फिनक्राफ्ट मीडिया अँड एंटरटेनमेंट ही निर्मिती संस्था त्यांच्या तिसऱ्या सिनेमाच्या तयारीला लागली आहे. विल्यम शेक्सपियरच्या ‘कॉमेडी ऑफ एरर’ या नाटकावर आधारित असलेल्या या सिनेमाचं शीर्षक ‘घे डबल!’ असं आहे. याचं दिग्दर्शन विश्वास जोशी करणार असून लेखन हृषिकेश कोळी करीत आहे. सध्या सिनेमाच्या पटकथेवर काम सुरू असून, संवादही हृषिकेशच लिहित आहे.

घे डबल पहिलाच सिनेमा

शेक्सपियरवरच्या लिखाणावर होऊ घातलेला मराठीतील या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे या सिनेमासाठी लेखकाला पहिल्यांदाच नफ्यातला १० टक्के वाटा मिळणार आहे. भविष्यात जर हा चित्रपट मराठी व्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेत तयार झाला तरी त्या चित्रपटाच्या नफ्यातीलही १० टक्के वाटा हृषिकेशला मिळेल. विश्वास जोशी यांनी निर्माता म्हणून उचललेलं हे पाऊल भविष्यात लेखकांच्या करारामधील टर्निंग पॉईंट ठरू शकेल. त्यामुळेच हृषिकेशलाही या सिनेमाच्या टायटलप्रमाणे ‘घे डबल’ फायदा होणार यात शंका नाही.


हेही वाचा-

रीमा-मोहन यांच्या ‘होम स्वीट होम’चा काव्यमय टीझर

समलैंगिकतेवरील निर्णयाचं बॉलिवूडकडून स्वागत


पुढील बातमी
इतर बातम्या