बटाट्याच्या चाळीत ‘भाई’ उत्तरार्धचा ट्रेलर लाँच

महाराष्ट्राच्या साहित्यविश्वातील थोर व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे उर्फ भाईंच्या जीवनावर आधारीत असलेल्या ‘भाई – व्यक्ती की वल्ली’ या चित्रपटाच्या पूर्वार्धानंतर आता उत्तरार्थ प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. ‘भाई’च्या उत्तरार्धाचा ट्रेलर नुकताच खास पुलंच्या शैलीत लाँच करण्यात आला.

ट्रेलर लाँच

एका वैशिष्ट्यपूर्ण वातावरणात आणि विशेष ठिकाणी ‘भाई’च्या उत्तरार्धाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या वायकाॅम १८च्या टिमने मुंबईतील पु. ल. देशपांडे अकादमीच्या प्रांगणात पुलंच्या साहित्यातील बटाट्याच्या चाळीचा जणू सेटच उभारला होता. चाळीतील खोल्या, दरवाजाबाहेर वाळत असलेले कपडे, मधोमध तुळशी वृंदावन, त्याभोवती काढलेली रांगोळी अशा पुलंमय वातावरणात ‘भाई’च्या उत्तरार्धाचा ट्रेलर लाँच सोहळा संपन्न झाला.

विविध प्रकारच्या प्रतिक्रिया

याप्रसंगी चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आपल्या भावना व्यक्त करण्यापूर्वी पूर्वार्धाला दिलेल्या भरभरून प्रेमाबद्दल सर्वांचेच आभार मानले. मांजरेकर म्हणाले की, केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर परदेशामधूनही ‘भाई’ला विविध प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या. यात सकारात्मक प्रतिक्रियांचा ओघ खूप मोठा होता. मी इतरांच्या मनातील सिनेमा बनवला नसून, तो माझ्या मनातील असल्याचं सांगत त्यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं.

प्रेक्षकांच्या मनातील पुलंबद्दलच्या भावना

मुंबई-पुण्यातील काही प्रेक्षकांनी तर आम्हाला आताच उत्तरार्ध पाहायचा असून, आम्ही थांबायला तयार नाही अशाही प्रतिक्रिया दिल्याचं सांगत मांजरेकर म्हणाले की, या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनातील पुलंबद्दलच्या भावना उत्स्फूर्तपणे बाहेर आल्या. काहींना दोन्ही चित्रपट एकत्र पाहायचे असल्याने तशी संकल्पनाही डोक्यात आहे. काही ठिकाणी दोन मध्यंतरांमध्ये सलग पूर्वार्ध आणि उत्तरार्ध हे दोन सिनेमे दाखवण्याची योजना आखण्यात येईल असंही मांजरेकर म्हणाले.

‘भाई’च्या पूर्वार्धामध्ये सागर देशमुखनं साकारलेले तरुण वयातील पुलं सर्वांनाच जितके आवडले, तितक्याच इरावती हर्षेने सादर केलेल्या सुनीताबाईही भावल्या. उत्तरार्धामध्ये मात्र तरुण आणि वयस्कर असे दोन पुलं पाहायला मिळणार असून ज्येष्ठ पुलंची भूमिका विजय केंकरे यांनी साकारली आहे. त्यांना शुभांगी दामले यांनी सुनीताबाईंच्या रूपात साथ केली आहे. याशिवाय उत्तरार्धामध्ये मराठी साहित्य व संगीत विश्वातील बरेच दिग्गज आणि पुलंच्या साहित्यातील व्यक्तिरेखा विविध कलाकारांच्या रूपात भेटणार आहेत.


हेही वाचा -

‘घाडगे & सून’ या मालिकेत आऊंची एंट्री

पटसंख्या घटल्याने पालिका शाळा बंद पडण्याची भीती!


पुढील बातमी
इतर बातम्या