कलाकारांच्या प्रेमात पडणं, त्यांची सर्व माहिती जमवणं असं बरेच जण आपल्या आवडत्या कलाकारासाठी करताना आपण पाहिलं असेल. तर दुसऱ्या बाजूला फॅनच्या अतिरेकी प्रेमाचा कलाकाराला कसा 'जबरा' त्रास होतो, हे आपण शाहरुख खानच्या 'फॅन' या सिनेमात पाहिलंच आहे. अशीच वेळ अभिनेता वरुण धवनवर सध्या आली आहे.
'बॉलिवूड लाईफ डॉट कॉम'ने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेता वरूण धवनला त्याची एक महिला फॅन मागील बऱ्याच दिवसांपासून सातत्याने फोन करत आहे. एवढंच नाही तर तिचा त्रास एवढा वाढलाय की वरुणने थेट पोलिसांत तिच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे. ही महिला वरुणला फोन आणि व्हाॅट्सअॅपवर मॅसेज करून त्रास देते. म्हणून वरुणने तिला कंटाळून सांताक्रूझ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. सध्या या त्रासदायक फॅनचा शोध सुरूच आहे.
वरुणने तक्रारीत म्हटलं आहे की, ‘ही महिला सतत व्हॉट्सअॅपवर मेसेज करते. या त्रासामुळे मी तिचा नंबर ब्लॉक केला. नंबर ब्लॉक केल्याने या महिलेने मला दुसऱ्या नंबरवरून फोन केला. व्हॉट्सअॅप मेसेजचं उत्तर न दिल्यास आत्महत्या करेन, अशी धमकी तिने दिली’.
वरुण धवनच्या लेखी तक्रारीनंतर सांताक्रूज पोलिसांनी भादंवि कलम ५०६ अंतर्गत तक्रार दाखल करुन तपास सुरु केला आहे. तसेच या प्रकरणाची तक्रार सायबर पोलिसांनाही पाठवण्यात आली आहे.
या सर्व प्रकारावरून एखाद्या अतिप्रेमात असलेल्या फॅनमुळे कलाकाराला किती मनस्ताप सहन करावा लागत असेल याची नक्कीच कल्पना येऊ शकते.
हेही वाचा-
बिग बींनी घेतली 98 वर्षांच्या चाहतीची भेट!
'पद्मावती'त 'तो' सीनच नाही, भन्साळी यांनी सोडलं मौन!