कंगनाचं ‘ते’ वक्तव्य चुकीचंच, उच्च न्यायालयाने सुनावले खडे बोल

मुंबईची पाकव्याप्त कश्मीरसोबत तुलना करणारी अभिनेत्री कंगना रणौत हिला मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने खडे बोल सुनावले. मुंबई आणि महाराष्ट्राबद्दल कंगनाचं वक्तव्य चुकीचं असून आपण त्याच्याशी सहमत नसल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं. (bombay high court slams actress kangana ranaut over her comments on mumbai and pok)

कंगनाने पाली हिल, वांद्रे येथील बंगल्यावर मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईविरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. तसंच या खटल्यात शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि कारवाई करणारे एच वॉर्डचे अधिकारी भाग्यवंत लाटे यांनाही प्रतिवादी करण्याची मागणी केली होती. यावर उच्च न्यायालयाने राऊत आणि लाटे यांना आपलं म्हणणं मांडण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार दोघांच्याही वतीने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं.

न्यायमूर्ती शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी मंगळवारी सुनावणी घेण्यात आली. यावेळी मुंबई आणि महाराष्ट्राबद्दल कंगना जे काही बोलली ते चुकीचंच आहे. आपण सगळेच महाराष्ट्रीय आहोत आणि महाराष्ट्रीय असल्याचा आम्हाला अभिमानच आहे, असं न्यायमूर्ती शाहरुख काथावाला यांनी तिला सुनावलं.

हेही वाचा - संजय राऊत यांचा ‘तो’ वादग्रस्त व्हिडिओ न्यायालयाने मागवला

याप्रकरणी संजय राऊत यांच्या वतीने बाजू मांडताना वकिलांनी न्यायालयाला सांगितलं की, खासदार राऊत यांनी कंगनाच्या बेकायदा बांधकामाबाबत महापालिकेकडे कोणतीही तक्रार केली नव्हती. त्यामुळे महापालिकेच्या कारवाईचा आणि त्यांचा काहीही संबंध नसून कंगनाचे आरोप बिनबुडाचे आहेत. तसंच वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगनाचं नाव घेऊन तिला कोणतीही धमकी दिलेली नाही. केवळ मुंबई आणि महाराष्ट्राबद्दल अप्रामाणिकपणा दाखविणाऱ्यांविरोधात त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्यावर तुमचे अशील खासदार असून त्यांनी संयमाने आपल्या भावना व्यक्त करायला हव्यात असं न्यायालयाने सांगितलं.

तर, पाली हिलमधील अनधिकृत बांधकाम प्रकरणावरून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठीच कंगनाने महापालिका आणि भाग्यवंत लाटे यांना न्यायालयात खेचलं आहे. लाटे यांनी फक्त त्यांचे काम केलं, अशी बाजू ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी लाटे यांच्या वतीने मांडली. याप्रकरणी पुढील सुनावणी ५ऑक्टोबरला होईल.

हेही वाचा - राजकारणात जाण्यासाठीच ‘त्यांच्या’कडून महाराष्ट्राची बदनामी- संजय राऊत

पुढील बातमी
इतर बातम्या