Advertisement

संजय राऊत यांचा ‘तो’ वादग्रस्त व्हिडिओ न्यायालयाने मागवला

अभिनेत्री कंगना रणौत विरूद्ध मुंबई महापालिका खटल्यात प्रतिवादी करण्यात आलेले शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची वादग्रस्त व्हिडिओ मुंबई उच्च न्यायालयाने मागवला आहे.

संजय राऊत यांचा ‘तो’ वादग्रस्त व्हिडिओ न्यायालयाने मागवला
SHARES

अभिनेत्री कंगना रणौत विरूद्ध मुंबई महापालिका खटल्यात प्रतिवादी करण्यात आलेले शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची वादग्रस्त व्हिडिओ मुंबई उच्च न्यायालयाने मागवला आहे. राऊत यांनी कंगनाविरोधात अपशब्द वापरल्याचा दावा तिच्या वकिलांनी केल्यानंतर न्यायालयाने हे निर्देश त्यांना दिले आहेत. 

कंगना रणौतने मुंबई पोलीस, राज्यातील ठाकरे सरकार यांच्याविरोधात वादग्रस्त ट्विटचा सिलसिला सुरू करताच, कंगना आणि संजय राऊत यांच्यात चांगलीच जुंपली. त्यातूनच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी हरामखोर आणि उखाड डाला अशी प्रतिक्रिया दिली होती. संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेमुळेच मुंबई महापालिकेने बांधकामावर कारवाई केल्याचा युक्तीवाद कंगनाच्या वकिलांना उच्च न्यायालयात केला. (bombay high court asks controversial video of shiv sena mp sanjay raut in kangana ranaut and bmc case)

हेही वाचा - कंगना आॅफिस तोडफोड प्रकरण: संजय राऊतही ओढले गेले खटल्यात

तसंच कुठल्याही बांधकामावर कारवाई करण्याआधी संबंधितांना किमान १५ दिवसांची नोटीस द्यायला हवी, असं मुंबई उच्च न्यायालयाने काही निवाड्यांमध्ये स्पष्ट केलेलं आहे. तर, सर्वोच्च न्यायालयाने संबंधित अनधिकृत बांधकामाच्या फोटोंसह किमान ७ दिवसांची नोटीस देण्याचा नियम घालून दिला आहे. तरीही महापालिकेने फक्त २४ तासांची नोटीस देऊन, आम्हाला बाजू मांडण्याची संधी न देताच घाईघाईने बांधकाम तोडल्याचं कंगनाच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं.

त्यावर, वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी कुठेही याचिकादार कंगनाचं नाव घेतलेलं नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, राऊत यांनी कंगनाविषयी आक्षेपार्ह शब्द वापरला नाही, असं तुमचं म्हणणं आहे का? या न्यायालयाच्या प्रश्नावर राऊत यांच्या वकिलांना समाधानकारक उत्तर देता आलं नाही. 

अखेर न्यायालयानं राऊत यांच्या मुलाखतीचा संपूर्ण व्हिडिओ न्यायालयात सादर करा, असे निर्देश कंगनाच्या वकिलांना दिले. परंतु राऊत यांच्या मुलाखतीचा संपूर्ण व्हिडिओ आम्हाला मिळवता आलेला नाही. तो मिळाला की न्यायालयात सादर करू, असं कंगनाच्या वकिलांनी स्पष्ट केलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement