'ग्रहण' फेम योगेश देशपांडे दिग्दर्शनाच्या वाटेवर

कारकिर्दीची सुरुवात अभिनयानं करणारे बरेच कलाकार कालांतरानं दिग्दर्शनाकडं वळतात. आपल्या मनातील सिनेमा बनवण्याचं स्वातंत्र्य मिळावं हा यामागचा मूळ हेतू असतो, पण काहीजण कारकिर्दीच्या सुरुवातीपासून दिग्दर्शनाच्या वाटेवर चालण्याची स्वप्न पाहू लागतात. असेच एक अभिनेते योगेश देशपांडे दिग्दर्शनाकडे वळले आहेत.

चौफेर कामगिरी 

योगेश यांच्याबद्दल सांगायचं तर त्यांनी आजवर चौफेर कामगिरी केली आहे. जाहिरात क्षेत्रातील कमर्शियल आर्टिस्ट, चित्रकार, निवेदक, संहिता लेखक, अभिनेता अशा बऱ्याच भूमिका योगेश यांनी आजवर बजावल्या आहेत. काही दिवसांपूर्वी गाजलेल्या 'ग्रहण' या मालिकेत त्यांनी साकारलेली प्रमुख भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आता त्यांचं मराठी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण होत आहे.

६६ सदाशिव

पदार्पणातच योगेश यांनी '६६ सदाशिव' असं काहीसं अनोखं आणि उत्सुकता वाढवणारं शीर्षक असलेल्या सिनेमाचं दिग्दर्शन करण्यास सुरुवात केली आहे. मूळात चित्रकार असलेल्या योगेश यांनी रेडीओ, टीव्हीसाठी जाहिरात लेखन-दिग्दर्शन केलं आहे. याशिवाय पुलं, गदिमा यांच्यावरील कार्यक्रमांसह विविध सांगीतिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचं संहिता लेखन आणि सादरीकरण करत असताना त्यांनी अभिनयाची रुचीही जपली. त्यांनी यापूर्वी 'अवंतिका', 'पिंपळपान', 'रेशीमगाठी' या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. 

चतुरस्र जबाबदारी 

'६६ सदाशिव' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाकडे वळण्याबद्दल योगेश म्हणाले की, जाहिरातविश्वात बरीच वर्षे काम केल्यानंतर आता काहीतरी वेगळं करावं असं मनात होतं. कॉर्पोरेट फिल्म्स, ब्रँड अॅड फिल्म्सच्या दिग्दर्शनाचा अनुभव होता. त्यामुळं चित्रपट क्षेत्र खुणावत होतं. याच दरम्यान '६६ सदाशिव'चा विषय सुचला. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन अशी चतुरस्र जबाबदारी सांभाळत मी अभिनयसुद्धा केला आहे. चित्रपटाचा विषय अतिशय वेगळा आहे.

लवकरच प्रदर्शित

या चित्रपटातील इतर कलाकारांची नावं अद्याप जाहीर करण्यात आली नसली तरी यात प्रतिभावंत, दिग्गज कलाकार दिसणार असल्याचं सांगितलं जात आहे. चित्रपटाची निर्मिती पुणे टॉकीज  प्रा. लि. यांची असून, हेमंत गुजराथी, विनय वाकलकर, सौरभ चिंचणकर हे निर्माते आहेत. चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनचं काम अंतिम टप्प्यात असून, चित्रपट लवकरच प्रदर्शित करण्याची योजना आखण्यात येत आहे.


हेही वाचा - 

पहा, आमिर-किरणचा मराठमोळा अंदाज!

Movie Review : 'सूर' चुकलेला कबड्डीचा डाव


पुढील बातमी
इतर बातम्या