Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
54,05,068
Recovered:
48,74,582
Deaths:
82,486
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
34,288
1,240
Maharashtra
4,45,495
26,616

Movie Review : 'सूर' चुकलेला कबड्डीचा डाव

यापूर्वी कबड्डीवर बरेच सिनेमे आले असल्यानं यात वेगळं काय पाहायला मिळणार? असा प्रश्न पडणं सहाजिक आहे. त्यामुळंच दिग्दर्शक मंगेश कंठाळेनं या सिनेमात यापेक्षा वेगळं काय दाखवलं याची उत्सुकता वाढते, पण सिनेमा पाहिल्यावर मात्र निराशाच होते.

Movie Review : 'सूर' चुकलेला कबड्डीचा डाव
SHARES

अलीकडच्या काळात मराठी सिनेसृष्टीतही खेळांवर आधारलेले सिनेमे बनत आहेत. एखाद्या खेळाबाबतचं प्रेम आणि आपल्या आवडत्या खेळाला विशिष्ट दर्जा मिळून तो उच्च पातळीवर पोहोचावा अशी धारणा यामागं बऱ्याचदा असते. 'सूर सपाटा' हा सिनेमा कबड्डीवर आधारित आहे. आज लाल मातीतील कबड्डी हा खेळ जागतिक पातळीपर्यंत पोहोचला आहे. त्यासोबतच महाराष्ट्राच्या लाल मातीत जिद्दीनं खेळला जाणारा हा रांगडा खेळ आज काहीशा खलनायकी वृत्तीतही अडकला असल्याचं या सिनेमात दाखवण्यात आलं आहे.


निराशाच

यापूर्वी कबड्डीवर बरेच सिनेमे आले असल्यानं यात वेगळं काय पाहायला मिळणार? असा प्रश्न पडणं सहाजिक आहे. त्यामुळंच दिग्दर्शक मंगेश कंठाळेनं या सिनेमात यापेक्षा वेगळं काय दाखवलं याची उत्सुकता वाढते, पण सिनेमा पाहिल्यावर मात्र निराशाच होते. 'सूर सपाटा, मार रपाटा, याच गड्याचा काढीन काटा...' असं म्हणत या सिनेमातील लहान कलाकारांची टीम जीव तोडून अभिनय करते. त्यांना उपेंद्र लिमये आणि संजय जाधव यांचीही चांगली साथ लाभते, पण एकूणच विस्कळीत लेखन आणि मांडणीमुळं त्याचा काहीच उपयोग होत नाही.


सात जणांची कथा 

ही कथा आहे चिंचोली काशिद गावातील जिल्हा परिषद शाळेत नववी इयत्तेत शिकणाऱ्या दिग्या (यश कुलकर्णी), परल्या (हंसराज जगताप), ज्ञाना (चिन्मय संत), टग्या (जीवन  कारळकर), इस्माईल (रुपेश बने), पूर्णा (चिन्मय पटवर्धन) आणि झंप्या (सुयश शिर्के) या सात मुलांची. टवाळखोरी, खोटं बोलणं आणि खोड्या करण्यात अव्वल असणाऱ्या या सात जणांची अभ्यासात बोंबाबोंब असते. कबड्डी मात्र यांचा जीव की प्राण असतो. या शाळेचे मुख्याध्यापक सहाने सर (गोविंद नामदेव) शिस्तप्रिय आणि कडक असतात. दहावीत शाळेचा १०० टक्के निकाल लावण्यावर त्यांचा भर असतो. 


घरून पळून स्पर्धेत सहभागी 

या शाळेचं एक वैशिष्ट्य असतं, ते म्हणजे २५ वर्षांपूर्वी या शाळेनं आंतरशालेय राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत बाजी मारलेली असते. याच शाळेतील अण्णा भोसलेनं (उपेंद्र लिमये) त्यावेळी इतिहास रचलेला असतो. पण हाच अण्णा आता अपंग झाला असून, दारूच्या आहारी गेलेला आहे. हीच परंपरा पुन्हा नव्यानं सुरू करण्यासाठी सात मित्रांची टीम उत्सुक असते. पण सहाने सर त्यांना परवानगी देत नाहीत. मग हे सातही जण चोरून शाळेचा फॅार्म भरतात आणि घरून पळून येऊन स्पर्धेत सहभागी होतात. त्यानंतर काय घडतं ते सिनेमात पाहायला मिळतं.


कबड्डीचा विस्कळीत डाव 

मुख्य म्हणजे लेखन पातळीवर आणखी चांगलं काम होणं गरजेचं असतं. तसं न झाल्यानं पुढील सर्वच पातळीवर सुमार दर्जाचं काम पाहायला मिळतं. हा मॅड कॅामेडी प्रकारात मोडणारा सिनेमा नसल्यानं प्रत्येक घटनेमागं लॅाजिक असणंही आवश्यक होतं. याचं भान राखून सर्व गोष्टी करायला हव्या होत्या. त्या न झाल्यानं या सिनेमाच्या रूपात पडद्यावर केवळ कबड्डीचा विस्कळीत डाव पाहायला मिळतो. दिग्दर्शक म्हणून मंगेश कंठाळे यांनी या सर्व पातळ्यांवर वैयक्तिक लक्ष देण्याची गरज होती. खेळावर आधारित सिनेमामध्ये लव्ह स्टोरीचा छोटासा का होईना अँगल असायलाच हवा हा अट्टाहास कशासाठी?


डाव फसला

या सिनेमात उपेंद्र लिमये आणि संजय जाधव हे दोन एक्के आहेत. त्यांचाही नीट वापर करण्यात आलेला नाही. जवळजवळ ७५ टक्के सिनेमा झाल्यावर यांची खरी एंट्री होते. कथेत ठराविक अंतरानं उपेंद्रची झलक पाहायला मिळते, पण त्याचा काहीच उपयोग होत नाही. संजयची एंट्री झाल्यावर काहीतरी घडेल असं वाटतं, पण त्याचाही वापर केवळ स्टाईल आयकॅान म्हणूनच करण्यात आला आहे. अखेरीस उपेंद्र जेव्हा मैदानात उतरतो, तेव्हा खऱ्या अर्थानं हा डाव रंगू लागतो. पण तोपर्यंत खूप उशीर होतो. तांत्रिक बाबींमध्ये कॅमेरावर्क छान आहे. उपेंद्र आणि मुलांवर चित्रीत करणारा एक भला मोठा सीन खूप चांगल्या प्रकारे कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. गीत-संगीताची बाजू ठीक आहे. एकूणच दिग्दर्शक म्हणून चांगला सिनेमा बनवण्याचा मंगेशचा डाव फसला आहे.


बोलीभाषेतील लहेजा सुरेख

या सिनेमातील बालकलाकार आज मोठे झाल्याचं आपण यापूर्वी प्रदर्शित झालेल्या सिनेमांमध्ये पाहिलं आहे. त्यामुळं हा सिनेमा रखडल्याचं जाणवतं. यश कुलकर्णी, हंसराज जगताप, चिन्मय संत आणि जीवन कारळकर यांनी आपापल्या व्यक्तिरेखा चांगल्या प्रकारे साकारल्या आहेत. गावाकडील मुलांच्या बोलीभाषेतील लहेजा सुरेखरीत्या आपल्या संवादांमध्ये उतरवला आहे. यांना चिन्मय पटवर्धन, रुपेश बने आणि सुयश शिर्के यांची चांगली साथ लाभली आहे. 


खलनायकी भावते

उपेंद्र लिमयेनं पुन्हा एकदा आपल्या व्यक्तिरेखेला योग्य न्याय देत आपली निवड सार्थ ठरवली आहे. संजय जाधवची खलनायकी झलकही मनाला भावते. त्याच्या खलनायकी शैलीचा दरारा सिनेमा पाहताना जाणवतो, पण हे सर्व व्यवस्थितपणे गुंफण्याची गरज होती. उपेंद्र आणि संजयची जुगलबंदी आणखी वेगळ्या पद्धतीनं रंगवली गेली असती तर धमाल आली असती. गोविंद नामदेव यांनी उत्तम काम केलं असलं तरी त्यांनी साकारलेले सहाने सर उगाचच थोडे लाऊड झाल्यासारखे वाटतात.

बऱ्याच दिवसांनी कबड्डी या खेळावर हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे, पण फार अपेक्षा ठेवून पाहायला जाल तर मात्र निराशा होईल.

दर्जा : **

...............................

मराठी चित्रपट : सूर सपाटा

निर्माता : जयंत लाडे

दिग्दर्शक : मंगेश कंठाळे

कलाकार : उपेंद्र लिमये, गोविंद नामदेव, संजय जाधव, यश कुलकर्णी, हंसराज जगताप, चिन्मय संत, जीवन  कारळकर, रुपेश बने, चिन्मय पटवर्धन, सुयश शिर्के, नंद इंगळे, प्रविण तरडे, हंसराज जगताप, अभिज्ञा भावे, भारत गणेशपुरे, सिद्धार्थ झाडबुके, शरयू सोनावणे, निनाद तांबडेहेही वाचा -

'वेडिंगचा शिनेमा'नं दिले ऑनलाइन गायक
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा