Advertisement

पहा, आमिर-किरणचा मराठमोळा अंदाज!

'नमस्कार मंडळी. कसे आहात? हसताय ना? हसायलाच पाहिजे...' हा नेहमीचाच परिचयाचा संवाद बोलत आमिर झी मराठी वाहिनीवर प्रसारीत होणाऱ्या 'चला हवा येऊ द्या' या शोमध्ये झळकणार आहे.

पहा, आमिर-किरणचा मराठमोळा अंदाज!
SHARES

मागील काही वर्षांपासून अभिनेता आमिर खान मराठीच्या प्रेमात असल्याचं आपण पाहत आहोत. तो केवळ प्रचंड जिद्दीनं मराठी शिकलाच नाही, तर सातत्यानं अस्खलित मराठी बोलण्याचा प्रयत्नही करताना दिसत आहे. याच आमिरचा आता सपत्नीक मराठमोळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.


मी आलोय तुमच्या गावात...

'नमस्कार मंडळी. कसे आहात? हसताय ना? हसायलाच पाहिजे...' हा नेहमीचाच परिचयाचा संवाद बोलत आमिर झी मराठी वाहिनीवर प्रसारीत होणाऱ्या 'चला हवा येऊ द्या' या शोमध्ये झळकणार आहे. या शो चा अँकर असलेल्या डॅा. निलेश साबळेच्या मुखात नेहमी असलेल्या या शब्दांपुढं '...कारण मी आलोय तुमच्या गावात' असं जोडत आमिर 'चला हवा येऊ द्या'मध्ये धमाल करताना दिसेल. त्याच्या जोडीला पत्नी किरण रावही असल्यानं आमिरच्या चाहत्यांसाठी हा दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल.


मराठमोळा लुक

'चला हवा येऊ द्या'मधील थुकरटवाडी या गावात आमिर अवतरल्याचं प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या खास एपिसोडसाठी आमिर-किरणनं मराठमोळा पोषाख परिधान केला आहे. डोक्यावर पांढरी टोपी, सदरा, लेंगा, कोल्हापूरी चप्पल, गळ्यात भगवा पंचा आणि कपाळाला टिळा असा आमिरचा लुक आहे. किरणबाईही या शोमध्ये चक्क नऊवारी नेसून वावरल्या आहेत. हातात हिरवा चुडा, कपाळावर कुंकू, नाकात नथ, गळ्यात मंगळसूत्र आणि आकाशी-जांभळ्या नऊवारीत या कार्यक्रमात किरण सहभागी झाली आहे.


झाडूचा मार

या शोमध्ये आमिर-किरणनं स्कीटवर परफॅार्मही केलं आहे. यावर परफॅार्म करताना भाऊ कदमसोबत पाणी या विषयावर गप्पा मारत असताना किरण झाडू घेऊन येते आणि आमिरसह भाऊलाही झाडूनं बडवून काढते. चुकीच्या ठिकाणी पाणी शोधण्याचा प्रयत्न केल्यानं दोघांनाही किरणकडून मार खावा लागतो. पाणी चंद्रावर शोधण्याची गरज नाही, तर ते आपल्या जमिनीतच असल्याचं किरण त्यांना सांगते. या स्कीटच्या माध्यमातून आपला अभिनयात डेब्यू झाल्याचं किरण म्हणते.


तूफान आलंया...

'तूफान आलंया'च्या निमित्तानं आमिर आणि किरण 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर अवतरणार आहेत. एप्रिल आणि मे महिन्यात पाण्यासाठी खूप काम होईल अशी आशा आमिरनं व्यक्त केलं आहे. या दरम्यान 'तूफान आलंया...' हा आपला शोदेखील टिव्हीवर येईल असं आमिर म्हणाला. पाण्याच्या निमित्तानं महाराष्ट्रभर फिरताना खूप काही शिकायला मिळत असल्याचं किरणनं म्हटलं आहे. गाव आणि शहरातील लोकांचं राहणीमान जरी भिन्न असलं तरी दोघांच्या आशा-आकांक्षा, सुख-दु:ख एकच असल्याचं किरण म्हणाली. गावातील लोकं प्रेमळ असल्यानं दोघांमधील दरी मिटते असंही किरणचं मत आहे.


डॅाक्टरवर आमिर फिदा

'चला हवा येऊ द्या'चा सूत्रसंचालक डॅा. निलेश साबळेच्या कामावर आमिर फिदा आहे. त्याचं कौतुक करताना आमिर थकत नाही. याबाबत निलेश म्हणाला की, आमिर सरांसोबत काम करणं हे स्वप्नवत आहे. पुण्यात जेव्हा वॅाटर कपची फायनल झाली, तेव्हा 'चला हवा येऊ द्या'मध्ये सहभागी होणार असल्याचं आमिर गंमतीनं म्हणाले होते. आज त्यांनी आपलं म्हणणं खरं केल्याचं निलेश म्हणाला. यावर आमिरनं वॅाटर कपच्या फायनलला निलेशनं लिहिलेल्या २० मिनिटांच्या स्कीटचं कौतुक केलं. ते पाहून आम्ही निलेशचे फॅन झाल्याचं आमिर म्हणाला. हा एपिसोड १ एप्रिल रोजी प्रसारीत करण्यात येणार आहे.



हेही वाचा -

Movie Review : लढवय्या शीखांच्या वीरगाथेचं 'केसरी' प्रतिबिंब

‘एफडीए’ ई सिगरेटवर बॅन घालण्याच्या तयारीत



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा