Advertisement

Movie Review : लढवय्या शीखांच्या वीरगाथेचं 'केसरी' प्रतिबिंब

भारतीयांनी नेहमीच कमी सैन्यबळ असूनही केवळ प्रचंड इच्छाशक्ती आणि कुशाग्र बुद्धीच्या बळावर शत्रूला नेस्तनाबूत केलं आहे. या सिनेमातील लढाईसुद्धा अशाच लढवय्या शीखांच्या शौर्याची गोष्ट सांगणारा आहे.

Movie Review : लढवय्या शीखांच्या वीरगाथेचं 'केसरी' प्रतिबिंब
SHARES

इतिहासात घडलेल्या लढाया किंवा युद्धप्रसंग नेहमीच वर्तमान काळातील पिढीला जागृत करणाऱ्या ठरल्या आहेत. त्यामुळंच ठराविक अंतरानं रुपेरी पडद्यावरही या लढायांचं प्रतिबिंब उमटत असतं. 'केसरी' या सिनेमातही एका अशाच लढाईचा समावेश आहे. भारतीयांनी नेहमीच कमी सैन्यबळ असूनही केवळ प्रचंड इच्छाशक्ती आणि कुशाग्र बुद्धीच्या बळावर शत्रूला नेस्तनाबूत केलं आहे. या सिनेमातील लढाईसुद्धा अशाच लढवय्या शीखांच्या शौर्याची गोष्ट सांगणारा आहे.


२१ शीखांची गाथा

अलीकडच्या काळात बऱ्याच सिनेमांमध्ये देशभक्तीची ज्योत प्रज्ज्वलीत करणाऱ्या व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अक्षय कुमारची मुख्य भूमिका असल्यानं या सिनेमाला एक वेगळंच महत्त्व प्राप्त झालं आहे. १८९७ म्हणजेच एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील काळ उभारत ही कथा ब्रिटिशांच्या गुलामगिरीत राहूनही केवळ आपल्या भारतमातेसाठी हजारोंच्या संख्येनं चालून आलेल्या अफगाणी शत्रूंशी प्राण पणानं लढलेल्या २१ शीखांची गाथा सांगते. अनुराग सिंग यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.


शीखांचा लढवय्या बाणा

या सिनेमात सारागढी युद्ध आहे. पूर्वी भारतात आणि सध्या पाकिस्तानात असलेल्या भारत-अफगाणिस्तान सीमारेषेवरील कोहाट या गावात हा सारागढी किल्ला होता. त्या काळी भारतीय सैन्य दल हे ब्रिटिश इंडियन आर्मी म्हणून ओळखलं जायचं. शीखांचा लढवय्या बाणा पाहून अफगाणी शत्रूंशी दोन हात करण्याकरीता ब्रिटिश सरकार त्यांचाच वापर करायचं. याच ब्रिटिश इंडियन आर्मीतील हवालदार ईश्वर सिंगनं (अक्षय कुमार) रचलेल्या इतिहासाची कथा या सिनेमात आहे. सारागढी किल्ल्यापासून जवळच गुलिस्तान आणि लॅाकहार्ट हे दोन किल्ले असतात. त्यामुळं एकदा का सारागढी सर केला की, पुढील दोन किल्ले जिंकणं शत्रूला सहज शक्य होतं. 


२० शिपायांचा लढा

गुलिस्तानमध्ये कर्तव्य बजावत असताना ईश्वर सिंग एका अफगाणी स्त्रीची हत्या थांबवतो. आदेशाचं उल्लंघन करीत तिचं रक्षण करणाऱ्या ईश्वर सिंगला शिक्षा म्हणून मग सारागढी किल्ल्यावर पाठवलं जातं. तिथल्या शीख जवानांची ड्युटीच्या नावाखाली केवळ चंगळ चाललेली असते. ईश्वर सिंग तिथे पोहोचून सर्वांना शिस्त लावतो. त्यांच्या मनात राष्ट्रभक्ती जागृत करतो. १२ सप्टेंबर १८९७ रोजी १० हजारांपेक्षा अधिक अफगाणी सारागढीवर चाल करून येतात. त्यांना सकाळी सारागढी, दुपारी गुलिस्तान आणि संध्याकाळी लॅाकहार्ट किल्ल्यांवर कब्जा करायचा असतो. ईश्वर सिंग आणि त्याचे २० शिपाई अफगाणींचा सामना करताना कसे प्राण पणानं लढले ते या सिनेमात पाहायला मिळतं.


शौर्यकथेत इतर मसाले

सिनेमाचा गाभा सुरेख आहे. बऱ्याच वर्षांनी शीखांच्या शौर्याची कथा सांगणारा सिनेमा प्रदर्शित झाल्यानं खूप उत्सुकता होती. अक्षय कुमारसारखा अभिनेता असल्यानं ती आणखी शीगेला पोहोचली होती. या घटनेवर पूर्ण सिनेमा बनवणं तसं कठीण काम होतं. त्यामुळं उपलब्ध माहितीच्या आधारे जे सादर केलं आहे त्याचं कौतुक करावं लागेल. विशेष म्हणजे जो प्रदेश आज आपल्याकडे नाही त्यासाठी लढलेल्या लढाईची कथा सादर करण्याचं धाडस अनुराग यांनी दाखवलं आहे. असं असलं तरी या शौर्यकथेत इतर मसाले टाकण्याचा मोह दिग्दर्शकानं टाळायला हवा होता.


गती मंदावणाऱ्या घटना

ईश्वरची पत्नी जीवनीचा ट्रॅक केवळ वेळ वाया घालवणारा नसून कथेच्या प्रवाहात व्यत्यय आणणारा आहे. ब्रिटिश अधिकाऱ्यासोबतच्या दृश्यांमध्येही वेळ जातो. त्यानंतर शिपायांना शिस्त लावण्याच्या घटनाही वेगात घडत नाहीत. त्यामुळं एकूणच सिनेमाची गती मंदावते. दोन दृश्यांमधील कंट्युनिटी मात्र अफलातून आहे. संपूर्ण सिनेमाभर खाकी पगडी धारण केलेला ईश्वर केसरी पगडी परिधान करतो तो खऱ्या अर्थानं सिनेमाचा टर्निंग पॅाइंट ठरतो. सिनेमातील संवाद अर्थपूर्ण आणि देशभक्ती जागवणारे आहेत. युद्धात केलेल्या काही युक्त्या ईश्वर सिंगच्या चातुर्याची प्रचिती देण्यासाठी पुरेशा आहेत.


अभिनयानं सिनेमाला तारलं

या सिनेमात एकोणीसाव्या शतकातील काळ अत्यंत सुरेखपणं उभारला आहे. कला दिग्दर्शनापासून कॅास्च्युमपर्यंत प्रत्येक बारीकसारीक गोष्टी अत्यंत बारकाईनं आणि अभ्यासपूर्ण सादर केल्याचं जाणवतं. सिनेमाचा कालावधी थोडा जास्त वाटतो. त्या तुलनेत गती मात्र थोडीशी संथ वाटते. संकलनात काही ठिकाणी कात्री लावण्याची गरज होती. देशभक्तीपर सिनेमांमध्ये गीत-संगीत ही महत्त्वाची बाजू असते, पण या सिनेमातील गीतरचना दीर्घकाळ स्मरणात राहणाऱ्या नाहीत. याशिवाय कथेशी एकरूपही होत नाहीत. त्यामुळं अनुराग सिंग यांनी हा सिनेमा बनवण्याचं धाडस दाखवलं असलं तरी ते तितकंसं प्रभावीपणे पडद्यावर उतरलेलं नाही. कलाकारांचा अभिनय आणि इतर काही गोष्टींनी सिनेमाला तारलं आहे.


प्रभावी अभिनय

या सिनेमातील ईश्वर सिंगला पाहताना कुठेही आपण अक्षयला पाहतोय असं वाटत नाही. चालणं, बोलणं, वागणं या सर्वांतून अक्षयनं साकारलेला ईश्वर सिंग स्मरणात राहतो. ईश्वर सिंगच्या पत्नीच्या भूमिकेतील परिणीती चोप्राला फारसं काम नसलं तरी तिने मात्र आपलं काम चांगलं केलं आहे. कोणताही विशिष्ट चेहरा नसलेले कलाकारांचा समावेश इतर व्यक्तिरेखांसाठी करण्यात आला आहे. या सर्वांनीच खूपच प्रभावी अभिनय करत अक्षयला सुरेख साथ दिली आहे. यात विवेक सैनी, विक्रम कोच्छर, सुविंदर विकी, वंश भारद्वाज, सुमित सिंग बसरा आदी कलाकारांचा समावेश आहे.

या सिनेमात इतर बऱ्याच त्रुटी राहिल्या असल्या तरी कलाकारांचा अभिनय आणि २१ शीखांनी १०००० शत्रूंशी दिलेला लढा अनुभवण्यासाठी 'केसरी' एकदा पाहायला हरकत नाही.


दर्जा - *** 

........................................

हिंदी चित्रपट : केसरी

निर्माता - करण जोहर, अरुणा भाटीया, हिरू यश जोहर, अपूर्वा मेहता, सुनील खेतरपाल

दिग्दर्शक - अनुराग सिंग

लेखन - अनुराग सिंग, गिरीश कोहली

कलाकार - अक्षय कुमार, परिणीती चोप्रा, विवेक सैनी, विक्रम कोच्छर, सुविंदर विकी, वंश भारद्वाज, सुमित सिंग बसरा, जसप्रीत सिंग, अजित सिंग मेहता, संदिप नाहर, मीर सरवर, अश्वाथ भट्ट



हेही वाचा -

'सेक्रेड गेम्स' आणि 'मिर्जापूर' आजही टॅापवर!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा