प्रसिद्ध साहित्यिक कादंबरीकार पटकथा लेखक, नाटककार किरण नगरकर यांचं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते ७७ वर्षाचे होते. त्यांच्या जाण्याने मराठी, हिंदी आणि इंग्रजी साहित्यक्षेत्राची मोठी हानी झाली आहे. किरण नगरकर यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. किरण नगरकर यांच्या 'सात सक्कं त्रेचाळीस', 'रावण अँड एडी', 'ककल्ड', 'द एक्स्ट्राज' यांसारख्या कादंबऱ्यांनी साहित्यप्रेमींच्या मनावर अधिराज्य निर्माण केलं आहे.
किरण नगरकर हे मागील काही दिवसांपासून ब्रेन हॅमरेज आजारानं त्रस्त होते. ब्रेन हॅमरेज झाल्यानं त्यांना बॉम्बे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान किरण नगरकर यांनी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला.
नगरकर यांनी त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून भाषेच्या सीमा ओलांडल्या होत्या. त्यांनी मराठीबरोबरच इंग्रजीतही लिखाण केलं होतं. मराठी साहित्य विश्वात त्यांची सात सक्कं त्रेचाळीस आणि ककल्ड ही कादंबरी प्रचंड गाजली. या दोन्ही कादंबऱ्या मराठी साहित्यविश्वातील क्लासिक कादंबरी म्हणून गणल्या जातात.
किरण नगरकर यांच्या कादंबऱ्या
सात सक्कं त्रेचाळीस
रावण अँड इडी
ककल्ड
गॉड्स लिट्ल सोल्जर
रेस्ट अँड पीस
जसोदा: अ नॉवेल
किरण नगरकर यांचे नाटक
बेडटाइम स्टोरी
कबीराचे काय करायचे
स्ट्रेंजर अमंग अस
द ब्रोकन सर्कल
द विडो ऑफ हर फ्रेंड्स
द एलिफंट ऑन द माऊस
ब्लॅक टुलिप
किरण नगरकर यांचा जन्म २ एप्रिल १९४२ मध्ये मुंबईत झाला होता. त्यांचं संपूर्ण शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून झालं. पुण्याचा फर्ग्यूसनमधून पदवी तर मुंबईच्या एसआयइएस कॉलेजमधून इंग्लिश विषयात पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं होतं. किरण नगरकर मराठी आणि इंग्रजी भाषेत लिहिणारे कादंबरीकार, नाटककार आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचं कुटुंब ब्राम्हो समाजाची तत्वं मानणारं होतं. किरण नगरकरांची पहिली कादंबरी इ.स. १९६७-६८च्या सुमारास 'अभिरुची' मध्ये प्रसिद्ध झाली होती.
किरण नगरकर यांची 'सात सक्कं त्रेचाळीस', 'दी एक्स्ट्राज', 'प्रतिस्पर्धी', 'रावण आणि एडी' ही पुस्तकं गाजली. त्यांना ‘ककोल्ड’ कादंबरीबद्दल साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला तसेच जर्मन सरकारने 'ऑर्डर ऑफ मेरीट' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.
हेही वाचा -
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ९७.८५ टक्के पाणीसाठी
पावसानं गाठला ३ हजार मिमी मोठा पल्ला