कॉलेजमधील गंमतीजमती सांगणार 'आम्ही बेफिकर'

कॅालेज जीवनातील आठवणी प्रत्येकानेच आपल्या मनाच्या एका कोपऱ्यात साठवून ठेवलेल्या असतात. त्या दिवसांमध्ये मित्र-मैत्रीणींसोबत केलेली धमाल, दंगा आणि मैत्री सारं काही आयुष्यभर मनात घर करून राहतं. त्यासोबतच त्या वयातील बेफिकीरवृत्तीही जन्मभर आठवणारी ठरते. अशाच बेफिकीर मित्रांच्या कॅालेज जीवनातील गंमतीजंमती सांगणारा 'आम्ही बेफिकर' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.

'आम्ही बेफिकर' या चित्रपटाचं दिग्दर्शन कविश्वर मराठे यांनी केलं आहे. खूप काही मिळवण्याच्या प्रयत्नात खूप काही गमावलं आणि त्याच गमावलेल्या अनुभवातून पुन्हा स्वप्न रंगवलं यावर हा चित्रपट आधारीत आहे. आजच्या तरुणांशी संवाद साधणारा, त्यांच्या मनातले विचार पडद्यावर मांडणारा आणि त्यांच्याच भाषेत बोलणारा हा चित्रपट असल्यानं 'आम्ही बेफिकर'चा लुकही यूथफुल आहे. आजपर्यंत कॉलेज जीवनावर आधारित अनेक चित्रपट आले असले, तरी त्यातही हा सिनेमा आपलं वेगळेपण जपणारा असल्याचं सांगितलं जातंय.

या सिनेमात सुयोग गोऱ्हे आणि मिताली मयेकर ही नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आजवर बऱ्याच मालिका-चित्रपटांतून काम केलेले सुयोग-मिताली 'आम्ही बेफिकर' या सिनेमासाठी प्रथमच एकत्र आल्याचे पहायला मिळेल. त्यांच्यासोबत राहुल पाटील, स्वप्नील काळे आणि अक्षय हाडके यांच्याही भूमिका आहेत. प्रणय अढांगळे यांनी या चित्रपटातील गाण्यांना स्वरसाज चढवला आहे. रोहित राऊत, हर्षवर्धन वावरे, कीर्ती किल्लेदार आणि सौरभ जोशी या गायकांच्या सुमधुर आवाजात त्यांनी या चित्रपटातील गाणी स्वरबद्ध केली आहेत. 'आम्ही बेफिकर' हा सिनेमा २९ मार्चला सर्वत्र प्रदर्शित होईल.


हेही वाचा -

बघा असा आहे, अमिताभ, शाहरुखचा 'बदला अनप्लग्ड'!

आयपीएलमध्ये कॅच घ्या, SUV कार जिंका!


पुढील बातमी
इतर बातम्या