जयंत सावरकर, विनायक थोरात यांना शासनाचा रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना राज्य शासनाकडून देण्यात येणारा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. सोबतच ज्येष्ठ रंगकर्मी विनायक थोरात यांना संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ५ लाख रुपये मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या दोन्ही पुरस्कारांचं स्वरुप आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी यासंदर्भातील घोषणा केली.

सावरकर यांची कारकिर्द

विजय तेंडुलकर यांच्या ‘माणूस नावाचे बेट’ या नाटकातून वयाच्या विशीतच सावरकर यांनी सर्वात पहिल्यांदा रंगभूमीवर पाऊल ठेवलं. आचार्य अत्रे लिखित ‘सम्राट सिंह’ या नाटकात साकारलेली विदुषकाची भूमिका प्रचंड गाजली होती. त्यांनी अनेक नाटक, सिनेमांमाधून आपली कला दाखवून दिली. सासरे नटवर्य मामा पेंडसे यांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी नोकरी करत आपली कारकिर्द घडवली. अभिनयाची संधी मिळण्याआधी सावरकर यांनी तब्बल १० वर्षे बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणूनही काम केलं. त्यांनी आकाशवाणी केंद्रातही काम केलं होतं.

पं. थोरात यांची कारकिर्द

पं. विनायक थोरात यांनी तबल्याचं शास्त्रोक्त शिक्षण आधी वडिलांकडे आणि नंतर यशवंतबुवा निकम तसंच रामकृष्णबुवा पर्वतकर यांच्याकडे घेतलं. सोबतच वयाच्या ५ व्या वर्षापासूनच त्यांनी जितेंद्र अभिषेकी, व्हायोलिन वादक डी. के. दातार, पं.भीमसेन जोशी, छोटा गंधर्व, मोगुबाई कुर्डीकर, मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर, किशोरी आमोणकर, राम मराठे, मालिनी राजूरकर, माणिक वर्मा, ज्योत्स्ना भोळे यांच्यासारख्या दिग्गज कलावंतांना तबल्याची साथ दिली. शिलेदार कुटुंबासोबत त्यांचे विशेष स्नेहबंध जुळले.

या दोन्ही ज्येष्ठ कलावंतांना हे पुरस्कार लवकरच समारंभपूर्वक प्रदान केले जाणार आहेत.

याआधी नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार प्रभाकर पणशीकर, विजया मेहता, भालचंद्र पेंढारकर, प्रा. मधुकर तोरडमल, सुलभा देशपांडे, सुधा करमरकर, आत्माराम भेंडे, अरुण काकडे, श्रीकांत मोघे, रामकृष्ण नायक, लीलाधर कांबळी आणि बाबा पार्सेकर यांना देण्यात आले आहेत.

तर, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार याआधी फैय्याज, प्रसाद सावकार, जयमाला शिलेदार, अरविंद पिळगावकर, रामदास कामत, कीर्ती शिलेदार, रजनी जोशी, चंद्रकांत उर्फ चंदू डेगवेकर आणि निर्मला गोगटे यांना देण्यात आले आहेत.


हेही वाचा-

'एफटीआयआय'च्या अध्यक्षपदी नसिरूद्दीन शाह?

कोल्ह्यांची लबाडी आणि लांडग्यांची चतुराई!


पुढील बातमी
इतर बातम्या