Advertisement

कोल्ह्यांची लबाडी आणि लांडग्यांची चतुराई!

हसमुख-मंजुळाचे सूर जुळलेले असल्यामुळे लांडगेंच्या घरी त्यांना एकांत हवा असतो. तर दुसरीकडे इतर मुलींच्या प्रेमात असलेल्या मि. कोल्हे (राजेश भोसले) यांना टेलिफोन आॅपरेटर मोनिकासोबत (प्रियांका कासले) वेळ घालण्यासाठी लांडगे यांची बेडरूम हवी असते. यासाठी तो लांडगेच्या मागे लागलेला असतो. त्याच दिवशी मिसेस कोल्हेलाही लांडगेंची बेडरूम हवी असते.

कोल्ह्यांची लबाडी आणि लांडग्यांची चतुराई!
SHARES

गैरसमजांमुळे पती-पत्नीच्या गोड नात्यामध्ये उडालेला गोंधळ आणि त्यातून होणारी विनोदनिर्मिती हा प्रकार तसा मराठी रंगभूमीवरील रसिकांसाठी नवा नाही. असं असलं तरीही याच गाभ्यावर आधारलेल्या संहितेमध्ये काही नावीन्यपूर्ण घटनांचा समावेश करून काॅमेडी करता येऊ शकते हे ‘मिस्टर अँण्ड मिसेस लांडगे’ या नाटकाने सिद्ध केलं आहे. प्रसंगानुरूप विनोदांना मिळालेली कलाकारांची अचूक साथ आणि त्यातून घडलेला विनोद रसिकांना खदखदून हसवणारा आहे.



कल्पना विलास कोठारी यांची प्रस्तुती आणि रंगनीलची निर्मिती असलेल्या या नाटकाची संहिता जरी मिस्टर अँण्ड मिसेस लांडगे यांना केंद्रस्थानी ठेवून लिहिण्यात आली असली तरी त्यात लांडगे यांचा बिझनेस पार्टनर कोल्हे यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. दोन जोडपी आणि एका प्रेमी युगूलाची गुलाबी कथा या नाटकात आहे. दर्जेदार निर्मितीमूल्यांच्या आधारे दिग्दर्शक विजय केंकरे यांनी हे नाटक सादर केलं आहे. सुरेश जयराम यांनी लेखन करताना संहितेमध्ये ठराविक अंतराने पेरलेले ट्विस्ट उत्सुकता वाढवणारे आहेत.

पुस्तक प्रकाशनाचा व्यवसाय करणाऱ्या मि. लांडगे (सुशांत शेलार) आणि त्यांच्या मिसेसची (परी तेलंग) ही कथा आहे. लांडगेंचं घर डेकोरेट करणारा डिझाइनर हसमुख (आस्ताद काळे) त्यांच्याच घरी मुक्कामाला असतो. मोलकरीण मंजूळावर (अलका परब) त्याचा जीव जडतो. एकीकडे हसमुख-मंजुळाचे सूर जुळलेले असल्यामुळे लांडगेंच्या घरी त्यांना एकांत हवा असतो. तर दुसरीकडे इतर मुलींच्या प्रेमात असलेल्या मि. कोल्हे (राजेश भोसले) यांना टेलिफोन आॅपरेटर मोनिकासोबत (प्रियांका कासले) वेळ घालण्यासाठी लांडगे यांची बेडरूम हवी असते. यासाठी तो लांडगेच्या मागे लागलेला असतो. त्याच दिवशी मिसेस कोल्हेलाही लांडगेंची बेडरूम हवी असते. अशातच लग्नाव्यतिरीक्त अफेअरच्या विरोधात असलेल्या लेखिका मिस ढमढेरे (रमा सोहनी-रानडे) आपल्या पुस्तकांच्या प्रकाशनाचा करार करण्यासाठी लांडगेंच्या घरी येऊन धडकतात. एकाच दिवशी घडलेल्या गोंधळात जे घडतं ते प्रेक्षकांना पोट धरून हसवतं.

संहितेचा गाभा जरी यापूर्वी बऱ्याचदा समोर आलेला असला तरी लेखकांनी त्यात लहान-लहान नावीन्यपूर्ण गोष्टी आणि ट्विस्टच्या माध्यमातून उत्सुकता वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. या नाटकात तीन जोड्या असून, तिघांचीही केमिस्ट्री खूप चांगली जुळली आहे. शीर्षक भूमिकेतील लांडगे साकारणाऱ्या सुशांत शेलार आणि परी तेलंग यांच्या केमिस्ट्रीचा विशेष उल्लेख करावा लागेल. हसमुख-मंजुळाची जोडीही छान आहे.

अचानक समोर आलेल्या परिस्थितीचा सामना करताना नवऱ्याला घरचा नोकर आणि डिझाइनरला स्वत:चा नवरा बनवणं या युक्त्या जुन्या झाल्या आहेत. त्याऐवजी काहीतरी नवीन हवं होतं, पण प्रसंगानुरुप आणि शाब्दिक विनोद छान आहेत. कलाकारांची एन्ट्री आणि एक्झीटचं अचूक टायमिंग साधतही हसवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विजय केंकरेंसारख्या अनुभवी दिग्दर्शकाने सर्वच कलाकारांकडून उत्तम काम काढून घेत बिटविन द लाईनमधील विनोदही अफलातून आहे. अमीर हडकर यांचं संगीत आणि दिनेश मेस्त्री यांच्या नेपथ्याने या नाटकाची बाजू मजबूत करण्याचं काम केलं आहे. 

सुशांत शेलारने साकारलेला लांडगे कमालीचा आहे. सुरुवातीला लांडगे आणि नंतर नोकराच्या रूपात त्याने जबरदस्त फटकेबाजी केली आहे. परी तेलंगनेही त्याला अचूक साथ दिल्याने दोघांची केमिस्ट्री छान वाटते. तिचं ते अचानक हसणं प्रेक्षकांना पोट धरून हसवणारं आहे. आस्तादने साकारलेला काहीशा बायल्या स्टाइलचा हसमुख आणि त्याला साथ देणारी अलका परब लक्ष वेधून घेतात. राजेश भोसले आणि मधुरा देशपांडे यांची विरोधाभासी केमिस्ट्री चांगली आहे. थोडक्यात काय तर जाहिरातीतील टॅगलाईनप्रमाणे या नाटकात खरंच वयाचं भान विसारायला लावणारी काॅमेडी आहे.

………………………………………………………….

नाटक : मिस्टर अँण्ड मिसेस लांडगे

दिग्दर्शक : विजय केंकरे

कलाकार : सुशांत शेलार, आस्ताद काळे, परी तेलंग, राजेश भोसले, मधुरा देशपांडे, अलका परब, रमा सोहनी-रानडे, अमर कुलकर्णी, प्रियांका कासले



हेही वाचा - 

शाहरुखची बर्थडे पार्टी मुंबई पोलिसांनी केली बंद

सुंदर नात्याची अनोखी भाऊबीज




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा