तनुश्री दत्ताची आता महिला आयोगाकडेही धाव

अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने अभिनेते नाना पाटेकर यांच्या विरोधात लैंगिक शोषणाचे आरोप करत एकच खळबळ उडवून दिली आहे. याविरोधात तिने नाना आणि इतर संबंधितांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. तर नानांच्या वकिलांनी तनुश्रीला कायदेशीर नोटीस बजावली आहे. त्यामुळे हे प्रकरण वाढतच चाललं आहे. अशात आता तनुश्रीनं महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे धाव घेत नानांविरोधात महिला आयोगाकडे रीतसर तक्रार दाखल केल्याची माहिती समोर येत आहे.

2008 मध्ये हॉर्न ओके प्लिज चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी नानांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा तनुश्रीचा आरोप आहे. १० वर्षानंतर जागं होत तिने हे आरोप केले आहेत. आरोप करण्यापर्यंतच ती थांबलेली नाही, तर तिने याविरोधात पोलिसांतही धाव घेतली आहे. मनसे कार्यकर्त्यांविरोधातही तिने तोडफोडची तक्रार दाखल केली आहे.

नानांच्या अडचणीत वाढ

तनुश्रीच्या आरोपाला नानांनी कायदेशीर नोटीस पाठवत उत्तर देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. असं असताना नानांच्या अडचणीत आता आणखी वाढ होणार आहे. कारण तुनश्रीने महिला आयोगाकडेही तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार महिला आयोग या प्रकरणाच्या सर्व कायदेशीर घडामोडींवर लक्ष ठेवणार असल्याचं समजतं. तर आता आयोग याप्रकरणी नेमकी काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा - 

Video: सत्य कायम सत्यच राहणार, तनुश्रीच्या आरोपांवर नानांनी सोडलं मौन

#Metoo: नाना पाटेकरनंतर कैलाश खेर, विकास बहल यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप

पुढील बातमी
इतर बातम्या