आणखी एक लेखक बनला अभिनेता!

चित्रपटांसाठी लेखन, दिग्दर्शन, निर्मिती करणाऱ्यांपैकी बऱ्याच जणांना आपणही कधीतरी अभिनय करून पाहू, असं वाटत असतं. त्यामुळे एखादी संधी मिळताच काही तंत्रज्ञ अभिनयाकडंही वळतात. आजवर बऱ्याच लेखकांनी लहान-मोठ्या भूमिकांमध्ये अभिनय करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आता लेखक गणेश पंडितही अभिनयाकडं वळले आहेत.

खुमासदार लेखनशैली

गणेश पंडित हे नाव आज अवघ्या महाराष्ट्राच्या परिचयाचं आहे. त्यांच्या लेखणीतून अवतरलेल्या 'बालक पालक', 'यल्लो', 'बाळकडू' या चित्रपटांना प्रेक्षकांनी दाद दिली आहे. प्रकाश झा, सौरभ शुक्ला, फरहान अख्तर, किरण यज्ञोपवीत, विद्यासागर अध्यापक, गिरीश जोशी यांसारख्या लेखकांचं अनुकरण करत पंडितही अभिनेता बनले आहेत. आपल्या खुमासदार लेखनशैलीनं लोकप्रिय झालेल्या पंडित यांचं अभिनय कौशल्यही लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. उत्तुंग ठाकूर निर्मित, शिवकुमार पार्थसारथी दिग्दर्शित 'डोक्याला शॉट' या चित्रपटात पंडित यांनी अभिनय केला आहे. 

एकांकिका लेखन, दिग्दर्शन

पंडित यांनी राणी मुखर्जीचा गाजलेला 'हिचकी', 'हॉर्न ओके प्लिज' अशा हिंदी चित्रपटांसाठी तर 'बंध नायलॉनचे', 'अंड्या चा फंडा' अशा मराठी चित्रपटांसाठी पटकथा, संवाद लेखकाची भूमिका बजावली असून, महाविद्यालयांसाठी एकांकिका लेखन आणि दिग्दर्शनही केलं आहे. आजवर पंडित यांच्या लेखणीतून साकारलेल्या विषयांनी नेहमीच प्रेक्षकांना भरभरून हसवत मनोरंजन केलं नसून प्रसंगी विचार करण्यालाही प्रवृत्त केलं आहे. 

डोक्याला शॉटमधून अभिनय

यापूर्वी त्यांनी 'रोड टू संगम', 'शूद्र : दि रायजिंग' आणि 'बालक पालक' या चित्रपटांत आपली झलक दाखवली होती. आता 'डोक्याला शॉट' या चित्रपटातून ते अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत सुव्रत जोशी, रोहित हळदीकर, ओमकार गोवर्धन आणि प्राजक्ता माळी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. प्रेक्षकांवर आपल्या लिखाणाची जादू करणाऱ्या पंडित यांच्या अभिनयाचीही जादू प्रेक्षकांवर भुरळ पाडेल अशी आशा बाळगायला हरकत नाही.


हेही वाचा - 

मराठी सिनेमाच्या पोस्टरवरही क्लॅाथलेस हिरो!

कॅाम्प्लिकेटेड ट्राएंगल लव्ह स्टोरी 'रेडीमिक्स'


पुढील बातमी
इतर बातम्या