शिवाजीपार्क १८ तासांत चकाचक, २५० झाडू आणि ३ हजार हातांची कमाल!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानंतर शिवाजीपार्क, चैत्यभूमीवर मोठ्या प्रमाणात महापालिकेकडून स्वच्छता मोहीम राबवून दुसऱ्याच दिवशी हा परिसर चकाचक केला आहे. तब्बल २५० झाडुंनी आणि कामगारांच्या ३ हजार हातांनी सलग १८ तास काम करत शिवाजीपार्कचा परिसर स्वच्छ केला.

७० टन कचरा निघाला

शिवाजी पार्क येथील या स्वच्छतेमध्ये १५०० कामगारांसह २५ मुकादम, २८ कनिष्ठ आवेक्षक, तसेच प्रत्येकी दोन सहायक अभियंता, दुय्यम अभियंता, सहायक मुख्य पर्यवेक्षक आदींनी १४ कचरा वाहनांच्या मदतीने तब्बल ७० मेट्रिक टन कचरा गोळा केला.

२५ एअर फ्रेशनर्स स्टिक्सचा वापर

कचरा साफ केल्यानंतर कोणत्याही प्रकारची दुर्गंधी पसरु नये, तसेच येथील वातावरण सुगंधित राहावे, यासाठी या सर्व परिसरात २५ एअर फ्रेशनर्स स्टिक्सचा वापर करण्यात आला. याशिवाय ७ सेंटेड फिनाईल आणि २०० किलो निर्जंतूकीकरण पावडरचा वापर करण्यात आला. याबरोबरच १०० किलो ३३ टक्के टी. सी. एल आदींचा वापर करण्यात आला.

सर्वप्रथम सर्व कर्मचाऱ्यांचे मी विशेष आभार मानेन. जसजशा शाळा आपल्या ताब्यात येत गेल्या, त्याप्रमाणे तिथे स्वच्छता केली जात होती. यंदा शिवाजीपार्कच्या कोणत्याही नागरिकाकडून स्वच्छतेबाबत तक्रार आली नाही.

रमाकांत बिरादार, सहायक आयुक्त, जी-उत्तर विभाग

२ हजार काळ्या पिशव्यांमधून कचरा जमा

या सर्व स्वच्छता मोहिमेमध्ये २ हजार काळ्या पिशव्यांमधून कचरा गोळा करण्यात आला. याशिवाय २५० झाडू, ३० ब्रश, २२० व्हिल्स बिन, १५० हँड बॅरोज, १५०० मास्क, ७०० ग्लोव्हज आदींचा वापर करण्यात आला. सहा डिसेंबरला रात्री अकरा वाजल्यापासून ते सात डिसेंबरला संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.


हेही वाचा

समुद्रासह किनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी धोरण करणार तयार - मुख्यमंत्री

पुढील बातमी
इतर बातम्या