Advertisement

समुद्रासह किनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी धोरण करणार तयार - मुख्यमंत्री

वर्सोवा बीच येथे अफरोज शाह आणि त्यांच्या सहकाऱ्यांमार्फत राबवण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेत रविवारी मुख्यमंत्र्यांनी सहभाग घेतला.

समुद्रासह किनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी धोरण करणार तयार - मुख्यमंत्री
SHARES

वर्सोवा बीच येथे स्वच्छतेसाठी अफरोज शाह यांनी हाती घेतलेलं काम खूप मोठं आहे. काही कारणास्तव बंद पडलेली मोहीम अफरोज यांनी पुन्हा सुरू केली असून, सरकार त्यांच्या पूर्ण पाठिशी आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी स्पष्ट केलं.


मसुदा लवकरच राज्य सरकारला देणार

वर्सोवा बीच येथे अफरोज शाह आणि त्यांच्या सहकाऱ्यांमार्फत राबवण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेत रविवारी मुख्यमंत्र्यांनी सहभाग घेतला. समुद्र आणि समुद्रकिनाऱ्याची सर्वांगीण स्वच्छता आणि संवर्धन यासंदर्भातील धोरण तयार करण्याबाबत अफरोज शाह हे काम करत आहेत. या धोरणाचा मसुदा ते लवकरच राज्य शासनाला देणार असून, त्यावर अजून संशोधन करून राज्य शासन हे धोरण निश्चित करेल, असं यावेळी मुख्यमंत्र्यानी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं.



येत्या सहा महिन्यांत कार्यवाही

मुंबई शहरातून दररोज साधारण 2100 एमएलडी सांडपाणी समुद्रात सोडले जाते. हे रोखण्यासाठी आपल्या पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारनं काही निकष निश्चित केले आहेत. त्यानुसार लवकरच मुंबईत समुद्रात सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाईल. त्यासाठी आम्ही काम करत असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. प्लॅस्टिकमुळेही समुद्रात आणि किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. प्लॅस्टिकवर निर्बंध आणण्याबाबत येत्या सहा महिन्यांत कार्यवाही करण्यात येत आहे. याबाबत लोकांची मतंही जाणून घेण्यात येणार आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.


चांगलं काम करणाऱ्यांना प्रोत्साहन

अफरोज शाह यांनी सुरू केलेलं सागरी किनारा स्वच्छतेचं काम खूप कौतुकास्पद आहे. काही जणांनी या कामाला विरोध केल्यानं त्यांची स्वच्छता मोहीम बंद पडलीहोती. पण आपल्या आवाहनानंतर अफरोज शाह आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वच्छता मोहीम पुन्हा सुरू केली आहे. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठीच आपण येथे आलो आहोत. चांगले काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला राज्य सरकार पूर्ण प्रोत्साहन आणि संरक्षण देईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेले शालेय विद्यार्थी, स्वयंसेवक यांना स्वच्छतेची, नद्या आणि समुद्राच्या संवर्धनाची तसेच निसर्गाच्या रक्षणाची शपथ दिली. यावेळी युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, अफरोज शाह उपस्थित होते.



हेही वाचा

अफरोज शाह यांच्या एका ट्वीटनं यंत्रणा हलली, वर्सोवा बीचवरचे कचऱ्याचे ढीग सफाचट!


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा