Advertisement

परिवहन मंत्र्यांनो, तुम्ही पाहिलाय का 'पिचकारी छाप' परळ डेपो?


परिवहन मंत्र्यांनो, तुम्ही पाहिलाय का 'पिचकारी छाप' परळ डेपो?
SHARES

प्रवासाला निघताना वा प्रवास आटोपल्यावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी डेपोत आपली 'पिचकारी छाप' सोडण्याची प्रवाशांची जुनी परंपरा. ही परंपरा मोडीत काढून एसटी डेपो चकाचक करण्यासाठी परिवहन मंडळाने महिन्याभरापूर्वी संत गाडगेबाबा स्वच्छता मोहीमेअंतर्गत खासगी कंपनीला साफसफाईचं कंत्राट दिलं.पण महिना होऊनही एसटी डेपोत जागोजागी साचलेला कचरा अन् खासकरून कानाकोपऱ्यात पान, तंबाखू, गुटखा खाऊन रंगवलेल्या भिंती दिसत आहेत.कधी झाली घोषणा?

महिन्याभरापूर्वी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी कुर्ला एसटी डेपोत संत गाडगेबाबा स्वच्छता मोहिमेची घोषणा करत राज्यभरातील एसटी डेपोची साफसफाई करण्यासाठी 'ब्रिक्स इंडिया' या खासगी कंपनीला ३ वर्षांसाठी अंदाजे ३५० कोटी रुपयांचं कंत्राट दिलं आहे. या कंपनीकडे राज्यातील सर्व एसटी डेपो, बस स्थानक, बस गाड्या, कर्मचाऱ्यांचं विश्रांतीगृह, सार्वजनिक शौचालय इ. च्या साफसफाईची जबाबदारी टाकण्यात आली आहे. पण महिना होऊनही एसटी डेपो चकाचक होणं तर सोडाच; पण साफसुफही दिसत नाहीत.परिस्थिती वेगळीच

मुंबईतील परळ आणि मुंबई सेंट्रल या महत्त्वाच्या एसटी डेपोची पाहणी मुंबई लाइव्हच्या प्रतिनिधीने केली असता, या डेपोत उघड्यावर पडलेला कचरा, प्लास्टीकच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसून आला. सोबतच आगाराची प्रत्येक भींत, खांब गुटखा, पान-तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी रंगलेले दिसले. ही तर झाली डेपोची अवस्था, पण कर्मचारी विश्रामगृहाच्या भींती, दरवाजे, सार्वजनिक शौचालयाचे कानेकोपरेही लाल पिचकाऱ्यांनी रंगलेले दिसून आले.काय म्हणताहेत प्रवासी

या संदर्भात साताऱ्याहून परळ डेपोत उतरलेले प्रवासी सचिन सावंत यांनी सांगितलं की, महिना झाला, तरी परळ एसटी डेपोत म्हणावी तशी साफसफाई दिसत नाही. जागोजागी उघड्यावर कचरा पडल्याने डास आणि माशांचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो. डेपोतील इमारतीच्या मागच्या बाजूला पाण्याच्या टाकीभोवती पाणी साचून मच्छर तयार होतात. हे मच्छर तिकीट खिडकीवर तिकीट काढण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांना अक्षरश: छळतात.तर, प्रवासी केदार माने म्हणाले की, डेपोतील खुर्च्या, एसटी बसच्या सीटवर धूळ साचलेली असते. बसवरही नेहमीच पिचकाऱ्यांची रंगरंगोटी असते. भलेही एसटी महामंडळाने खासगी कंपनीकडे साफसफाईचा ठेका दिलेला असला, तरी प्रवाशांनीही ठिकठिकाणी तंबाखू, खुटखा खाऊन पिचकाऱ्या मारू नये, कचरा उघड्यावर टाकू नये.संत गाडगेबाबा स्वच्छता मोहिमेची सुरूवात आम्ही कुर्ला डेपोतून केली. साफसफाईसाठी मोठ्या डेपोत प्रत्येकी ८ ते १० आणि लहान डेपोत ३ ते ५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक डेपोत साफसफाईसाठी किती मनुष्यबळाची आवश्यकता आहे, यासाठी आम्ही नुकतंच सर्वेक्षण केलं होतं. हे सर्वेक्षण पूर्ण झालं असून येत्या १५ दिवसांत अतिरिक्त मनुष्यबळाची नेमणूक करण्यात येईल. जेणेकरून स्वच्छता मोहीम आणखी चांगल्या पद्धतीने राबवता येईल.
- रणजीत सिंग देओल, महाव्यवस्थापक, एसटी महामंडळ


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा