5G प्रकरणात हायकोर्टाचा जुही चावलाला दणका, ठोठावला २० लाखांचा दंड

अभिनेत्री जुही चावलाची (Juhi chawla) 5G रोल आऊटविरोधातील याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं (Delhi High Court) फेटाळून लावली आहे. यासोबतच तिला २० लाखांचा मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. इतकंच नाही तर कोर्टानं जुही चावलाला आणखी एक मोठा धक्का दिला आहे.

दिल्ली उच्च न्यायालयानं म्हटलं आहे की, या प्रकरणात याचिकाकर्त्यानं कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग केला. याचिका केवळ प्रसिद्धीसाठी दाखल केली गेली आहे. म्हणूनच याची लिंक सोशल मीडियावर शेअर केली गेली. न्यायमूर्ती जीआर मिधा यांच्या खंडपीठानं आदेशात म्हटलं आहे की, हे आरोप त्रासदायक आहेत.

हायकोर्टाच्या सुनावणीदरम्यान गाणे गाणाऱ्या व्यक्तीवरही कारवाई करण्यात आली आहे. संबंधित व्यक्तीला आणि बेकायदेशीरपणे सुनावणीत भाग घेतलेल्या सर्वांना न्यायालयानं अवमान नोटीस बजावली आहे. कोर्टाच्या सुनावणीत अडथळा आणल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयानं दिल्ली पोलिसांना अशा लोकांवर कारवाई करण्यास सांगितलं आहे.

दिल्ली उच्च न्यायालयानं जुही चावलाच्या याचिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सरकारला (Government) निवेदन न देता 5G वायरलेस नेटवर्क (Wireless Network) तंत्रज्ञानाला आव्हान देण्यासाठी थेट कोर्टात आल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला होता. तंत्रज्ञान संबंधित तिच्या चिंतेबाबत सरकारला कोणतंही निवेदन न देता, जुही चावला यांनी देशात 5 जी वायरलेस नेटवर्क स्थापित करण्याच्या विरोधात थेट दावा दाखल केला.

जुही चावला म्हणाली होती की, या 5जी योजनांमुळे मानवांवर गंभीर, अपरिवर्तनीय परिणाम होतो आणि पृथ्वीवरील पर्यावरणाचे कायमचे नुकसान होण्याचा धोका आहे. अ‍ॅडव्होकेट दीपक खोसला यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली होती.

आपला अजेंडा 5 जीवर बंदी घालण्याचा नसल्याचंही जुहीनं स्पष्ट केलं होतं. ती म्हणाली की, लोकांचा गैरसमज आहे की, आम्ही 5 जी तंत्रज्ञानाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. आम्हाला सर्वांना हे स्पष्ट सांगायचं आहे की, आम्ही 5 जी तंत्रज्ञानाविरूद्ध नाही.


हेही वाचा

१६ वर्षांच्या मुलाची कमाल, कॅमेरात कैद केले चंद्राचे फोटो

मुंबई मेट्रो करणार ९ हजार झाडांचं मियावाकी पद्धतीने रोपण

पुढील बातमी
इतर बातम्या