गूडन्यूज! मुंबईत ६ जूनपासून पावसाची शक्यता

सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईत ६ जून रोजी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. सोमवारी अंदमानात मान्सून दाखल झाला आहे. केरळमध्ये १ जूनला मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

अधिक माहितीनुसार, पुढील ५ दिवस अंदमान आणि केरळमधील नजिकच्या शहरांमध्ये मुसळधार पाऊस होईल. केरळसह दक्षिण भारतातील काही राज्यांना पावसाने झोडपून काढलेलं असताना महाराष्ट्रातीलही नऊ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच मोसमी पावसाची प्रगती वेगाने होत असल्याने हा पाऊस अंदमान आणि निकोबार बेटांवर धडकला आहे.

या पार्श्वभूमीवर कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

यावर्षी मान्सून भारतात १० दिवस आधीच दाखल होण्याची शक्यता आहे. युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर पॉडकास्ट संस्थेकडून हा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच उष्णतेच्या तडाख्यातून नागरिकांची सुटका होणार आहे.

यंदा महाराष्ट्रात सर्वसाधारण पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. जून महिन्यात कमी पाऊस, जुलै महिन्यात साधारण पाऊस तर ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस पडेल, असा अंदाज आहे. मात्र, शेतकऱ्यांना वर्षभर अवकाळी पावसाचाही सामना करावा लागेल, असे भाकीतही वर्तविण्यात आले आहे.


हेही वाचा

अंदमान आणि निकोबारच्या बेटांवर मान्सून दाखल, महाराष्ट्रातल्या 'या' जिल्ह्यांना अलर्ट

वेळेआधीच दाखल होणार मान्सून, हवामान खात्याचा अंदाज

पुढील बातमी
इतर बातम्या