Mumbai Rain: मुंबईत पावसाची जोरदार हजेरी

मुंबईत पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. सोमवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास जोरदार पावसानं हजेरी लावली. मुंबईतील चेंबूर, कुर्ला, सायन, अंधेरी, दादर या परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या. दरवर्षी महाराष्ट्रात जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात होते. मात्र यंदा जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी मान्सून पूर्व पावसाने ठिकठिकाणी हजेरी लावली आहे. यामुळं उकाड्यानं  हैराण झालेल्या मुंबईकरांची सकाळ काहीशी दिलासादायक झाली. 

मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये येत्या ३ आणि ४ जून रोजी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दक्षिणपूर्व आणि लगतच्या मध्यपूर्व अरबी समुद्र आणि लक्षद्वीप भागात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे. त्यामुळं चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या ४८ तासात मुंबईसह ठाणे, पालघर या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 

सध्या राज्यातील काही भागात थोड्या फार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईमध्ये रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. सोमवारी सकाळी मात्र पावसाला सुरूवात झाली. बुधवार ३ जून रोजी मुंबईतील पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. या काळात वाऱ्यांचा जोरही वाढलेला असणार आहे. 

३ आणि ४ जून या दिवशी मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असाही इशारा देण्यात आला आहे. तर सध्या समुद्रात असलेल्या मच्छिमारांनी किनाऱ्याकडे परतावे अशा सूचनाही त्यांना देण्यात आल्या आहेत. २ ते ३ जून या काळात दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीवर ६५ ते ८५ किलोमीटर प्रती तास असा वाऱ्याचा वेग असेल. हा वेग वाढून ३ जून रोजी सकाळी महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टीजवळ ९० ते ११० किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.


हेही वाचा -

अवघ्या 15 दिवसात 6 लाख नागरिकांना घरपोच मद्यसेवा, तर इतके गुन्हे दाखल

मुंबईतील 'या' ५ स्थानकांसाठी टॅक्सीसेवा


पुढील बातमी
इतर बातम्या