पवई तलाव ओव्हरफ्लो, मात्र मिठी नदी...

मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावांपैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा पवई तलाव पूर्ण भरुन वाहू लागला आहे. मात्र तलाव ओव्हर फ्लो झाल्यानं तलावाचं पाणी मीठी नदी पात्रात जाण्याची शक्यता आहे.

गेल्या तीन दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे. पवई तलावाची जलधारणा क्षमता जवळपास ५४५ कोटी लिटर इतकी आहे. या तलावाचे पाणी पिण्यायोग्य नसते. त्यामुळे प्रामुख्यानं तलावातील पाण्याचा उपयोग औद्योगिक क्षेत्रासाठी केला जातो.  

चिंताजनक बाब म्हणजे तलाव ओव्हर फ्लो झाल्यानं तलावाचं पाणी मीठी नदी पात्रात जातं. त्यामुळे मीठी नदीची पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे मीठी नदीच्या किनाऱ्यावर असणाऱ्या घरांमध्ये पाणी शिरण्याचा धोका वाढला आहे.

पवई तलावाचे बांधकाम १८९० मध्ये पूर्ण झाले. या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे १२.५९ लाख रुपये एवढा खर्च त्यावेळी आला होता. या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे ६.६१ चौरस किलोमीटर आहे. तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे २.२३ चौरस किलोमीटर एवढे असते. तलावाची पूर्ण भरून वाहण्याची पातळी ही १९५ फूट आहे. तलाव पूर्ण भरलेला असताना तलावामध्ये ५४५.५ कोटी लिटर पाणी असते. हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे मिठी नदीला जाऊन मिळते.


हेही वाचा

पालघरमधल्या धबधब्यात वाहून गेलेल्या ५ जणांचे मृतदेह सापडले

पुढील बातमी
इतर बातम्या