Advertisement

मुंबईत पावसाची तूफान हजेरी; पुढचे २४ तास 'मुसळधार'


मुंबईत पावसाची तूफान हजेरी; पुढचे २४ तास 'मुसळधार'
SHARES
मुंबईसह ठाण्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. रविवारी सकाळपासून न विश्रांती घेता पावसानं मुंबईकरांना झोडपून काढलं आहे. मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूभीवर मुंबईकरांनी घरी राहण पसंत केल्यानं वाहतूककोंडीची परिस्थिती सध्या उद्भवलेली नाही.

रविवारी सकाळी ८ वाजल्यापासूनच पावसाने पुन्हा एकदा मुंबई-ठाण्यात जोर धरला. वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईत गारवा निर्माण झाला होता. जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे अवघ्या तासाभरातच मुंबईतील सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली. हिंदमाता, वडाळ्याचा पंचायत रोड, धारावी क्रॉस रोड, काळाचौकीतील सरदार हॉटेल परिसर, माटुंग्याला एसआयईएस कॉलेज, भायखळा पोलिस ठाणे, चेंबूर पुलाखाली, चेंबूर रेल्वे स्थानक, अंधेरी सबवे, वांद्रे येथील नॅशनल कॉलेजजवळ पाणी साचले होते. 

पावसामुळे कुर्ला बैलबाजार येथे झाड कोसळले असून यात कोणतीही हानी झाली नाही. त्याचप्रमाणं दुपारी समुद्राला मोठी भरती येणार असून, दुपारी १२ वाजून २३ मिनिटांनी समुद्रात ४,६३ मीटरच्या उंचच उंच लाटा उसळणार आहेत. त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच समुद्र किनारी जाऊ नये, असं आवाहनही मुंबईकरांना करण्यात आले आहे. 

सकाळपासून सुरू झालेला जोरदार पाऊस आणि त्यातच दुपारी समुद्राला भरती येणार असल्याने मुंबईतल्या अनेक भागात पाणी साचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. येत्या २४ तासांत मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच मुंबईकरांना कारण नसताना घराबाहेर न पडण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. 

कुलाबा वेधशाळेने मुंबईत १२९.६ मिलीमीटर आणि सांताक्रुझ वेधशाळेने २००.८ मिलीमिटर पावसाची नोंद केली आहे. दरम्यान, ठाण्यातही काल दिवसभरात २६५.१९ मिलीमीटर पाऊस पडला. ठाण्यात एका दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय