जॉनी लिव्हर करणार ‘एक टप्पा आऊट’

कॉमेडीयन जॉनी लिव्हरने अनोख्या शैलीच्या बळावर आपला एक वेगळा चाहतावर्ग तयार केला आहे. आजवर हिंदी सिनेमांमधून हसवणारा जॉनी छोट्या पडद्यावरील मराठी प्रेक्षकांना ‘एक टप्पा आऊट’ करत हसवणार आहे.

हास्याचं रामबाण औषध

आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात संवाद तर हरवत चालला आहेच, पण त्यासोबतच चेहऱ्यावरील हसूही मावळत आहे. हास्याला सुदृढ जीवनाचं टानिक मानलं जातं. त्यामुळंच छोट्या पडद्यावर काय किंवा मोठ्या पडद्यावर सर्वच ठिकाणी हास्यरंग उधळण्याचा प्रयत्न करत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं जातं. यात रिअलिटी शोजचाही मोठा वाटा आहे. ऑफिसचं टेन्शन घालवत इतर सर्वच समस्यांवर स्टार प्रवाह वाहिनी हास्याचं रामबाण औषध घेऊन येत आहे. स्टार प्रवाहवर सुरू होणाऱ्या नवीन शोचं शीर्षक आहे ‘एक टप्पा आऊट’.

जॉनी लीव्हर जज

या शोचं शीर्षक जितकं हटके आहे, तितकीच संकल्पनाही आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राभर अस्सल विनोदवीरांचा शोध घेतला जाणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दडलेल्या हिऱ्यांना पैलू पाडण्याचं काम जॉनी लिव्हर करणार आहे. मराठीतले दोन दिग्गज कलाकारही जॉनीसोबत असणार आहेत. या कार्यक्रमाविषयी बोलताना शाब्दिक कोटी करत जॉनी म्हणाला की, ह्युमर आहे म्हणूनच त्या जागी जज म्हणून जॉनी लीव्हर आहे.

दोन कलाकारांबाबत गुप्तता

‘एक टप्पा आऊट’च्या माध्यमातून समाजात दडलेल्या नव्या टॅलेण्टसाठी खूप मोठं व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. या अनोख्या संधीचा लाभ सर्वांनी घ्यायला हवा. ‘एक टप्पा आऊट’मध्ये माझा सहभाग असल्याचा एक महाराष्ट्रीय म्हणून अभिमान आहे, असं म्हणत जॉनीने आपल्या भावना व्यक्त केल्या. या शोमध्ये जॉनीसोबत जजच्या भूमिकेत विनोदाचे आणखी दोन हुकमी एक्के कोण असतील? ते अद्याप गुप्त ठेवण्यात आलं आहे.

३ मार्चपासून ऑडिशन्स

३ मार्चपासून ‘एक टप्पा आऊट’च्या ऑडिशन्स सुरू होणार आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि रत्नागिरी येथे या ऑडिशन्स पार पडतील. या ऑडिशनबद्दलची माहिती लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवरुन देण्यात येईल. या शोबाबत स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले की, सध्या जगाला हसण्याची आणि हसवण्याची गरज आहे. यासाठीच आम्ही ‘एक टप्पा आऊट’ हा अनोखा स्टॅण्ड अप कॉमेडी शो घेऊन येत आहोत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दडलेल्या टॅलेण्टचा शोध या कार्यक्रमातून घेतला जाईल. दिग्गज परीक्षकांचं त्यांना मार्गदर्शन लाभेल. त्यातूनच त्यांच्या कारकिर्दीसही हातभार लाभेल असंही राजवाडे म्हणाले.


हेही वाचा -

क्रीडा, सांस्कृतिक आणि संशोधनात मुंबई विद्यापीठ अव्वल

विज्ञान व अभियांत्रिकीचे चार निकाल जाहीर


पुढील बातमी
इतर बातम्या