Advertisement

क्रीडा, सांस्कृतिक आणि संशोधनात मुंबई विद्यापीठ अव्वल

क्रीडा, सांस्कृतिक आणि संशोधनातील तिन्ही स्पर्धांमध्ये मुंबई विद्यापीठानं निर्विवाद वर्चस्व गाजवत राज्यात अव्वल स्थान पटकावलं आहे.

क्रीडा, सांस्कृतिक आणि संशोधनात मुंबई विद्यापीठ अव्वल
SHARES

क्रीडा, सांस्कृतिक आणि संशोधनातील तिन्ही स्पर्धांमध्ये मुंबई विद्यापीठानं निर्विवाद वर्चस्व गाजवत राज्यात अव्वल स्थान पटकावलं आहे. राजभवन आयोजित क्रीडा महोत्सव, इंद्रधनुष्य आणि अविष्कार या तिन्ही स्पर्धांवर मुंबई विद्यापीठाने विजयी मोहोर उमटवली आहे.


क्रीडा महोत्सव

१४-१८ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या २२ व्या क्रीडा महोत्सवात मुंबई विद्यापीठानं दमदार कामगिरी केली आहे. या क्रीडा महोत्सवात ३५० गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद पटकावत मुंबई विद्यपीठानं राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. जनरल चॅम्पियनशिप टीम इव्हेंट रोटेटिंग ट्रॉफी पुरुष गटातून १९० गुणांसह आणि महिला गटातून १६० गुणांसह मुंबई विद्यापीठानं ३५० गुणांची कमाई करत ओव्हरऑल चॅम्पिअनशिप ट्रॉफी पटकावली आहे. मुंबई विद्यापीठानं सलग तीन वेळा क्रीडा महोत्सवाचं विजेतेपद पटकावलं आहे.


इंद्रधनुष्य

१६ व्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सव ‘इंद्रधनुष्य’मध्ये मुंबई विद्यापीठानं बाजी मारली आहे. ७ ते ११ डिसेंबर २०१८ दरम्यान यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या या युवा महोत्सवामध्ये मुंबई विद्यापीठाने बाजी मारली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत मुंबई विद्यापीठानं तब्बल १५ वेळा हा चषक आपल्याकडे राखण्याचा बहुमान मिळवला आहे. वाङमय, ललितकला, संगीत, नाट्य आणि नृत्य या स्पर्धांमध्ये विजयी सलामी देत सांस्कृतिक युवा महोत्सवामध्ये मुंबई विद्यापीठानं ८७ गुणांची कमाई करत सर्वसाधारण विजेतेपद मिळवून अव्वल स्थान पटकावलं आहे.



अविष्कार संशोधन स्पर्धा

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे १५ ते १८ जानेवारी २०१९ दरम्यान पार पडलेल्या १३ व्या आंतरविद्यापीठ अविष्कार संशोधन स्पर्धेमध्ये मुंबई विद्यापीठानं ५८ गुणांसह अंतिम विजेतेपद पटकावून प्रथम क्रमांक मिळवला आहे. यात विद्यापीठानं नेत्रदिपक कामगिरी करत आठ सुवर्ण आणि सहा रौप्य पदकांची कमाई केली आहे. सलग दुसऱ्यांदा मुंबई विद्यापीठानं अविष्कार संशोधन स्पर्धेवर विजयी मोहोर उमटली आहे. विद्यापीठाच्या वतीनं या स्पर्धेमध्ये एकूण ४८ संशोधक सहभागी झाले होते.


राजभवन आयोजित क्रीडा, सांस्कृतिक आणि संशोधनाच्या तिन्ही स्पर्धेतील मुंबई विद्यापीठाच्या या दैदिप्यमान कामगिरीमुळं राज्य स्तरावर मुंबई विद्यापीठाचा नावलौकीक वाढला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशानं मुंबई विद्यापीठाला एक वेगळी उंची मिळवून दिली असून, स्पर्धेतील सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा.

- प्रोफेसर सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ



हेही वाचा -

विज्ञान व अभियांत्रिकीचे चार निकाल जाहीर

मुंबईतील आणखी तीन कॉलेजांना स्वायत्तता



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा