शहरात ४४ मंडप बेकायदा, महापालिकेची कबुली

मुंबई शहरात एकही बेकायदा गणेशोत्सव मंडप नसल्याचा दावा करणाऱ्या मुंबई महापालिकेने शहरात ४४ बेकायदा मंडप असल्याची कबुली अखेर मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. एकाही बेकायदा मंडपाला परवानगी देऊ नये, असे आयुक्तांनी सक्त आदेश देऊनही १३ विभाग कार्यालयांतील साहाय्यक आयुक्तांनी ही परवानगी दिल्याचं महापालिकेने म्हटलं आहे. ही कबुली महापालिका चांगलीच भोवणार असल्याचं म्हटलं जात आहे. कारण न्यायालयाने महापालिका आयुक्तांना अवमान नोटीस बजावण्याचा इशारा दिला आहे. न्यायालय यासंदर्भातील आदेश सोमवारी जारी करण्याची शक्यता आहे.

दावा खोडला तरीही...

मुंबई शहरात १३२ व उपनगरात २१७ बेकायदा मंडप असल्याची माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिली होती. परंतु सरकारचा हा दावा खोडून काढत महापालिकेने शहरात एकही बेकायदा मंडप नसल्याचा दावा केला होता. त्यावर न्यायालयाने आकडेवारीत इतकी तफावत का आहे? असा प्रश्न विचारत राज्य सरकारला स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले होते.

तर, अवमान याचिका

तर, त्याआधीच्या सुनावणीत न्यायालयाने सण, उत्सवांदरम्यान रस्त्यावर एकही बेकायदा मंडप उभारू देऊ नका, असे निर्देश राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाला दिले होते. रस्त्यावर बेकायदा मंडप उभारल्यास न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला होता.

पथकाची पाहणी

त्यानंतर बुधवारी न्या. अभय ओक आणि न्या. एम. एस. सोनाक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या सुनावणीत महापालिकेतर्फे माहिती देताना अ‍ॅड. अनिल साखरे यांनी सांगितलं की, महापालिका आणि महसूल विभाग अधिकाऱ्यांच्या पथकाने ८६३ मंडपांची पाहणी केली. त्यातील ३२ बेकायदा मंडप आढळून आले.

सहाय्यक आयुक्तांकडे बोट

या मंडपांवर महापालिकेने तात्काळ कारवाई केली. तर पाहणीच्या दुसऱ्या टप्प्यात ४४ बेकायदा मंडप आढळून आले. या मंडपांना १३ विभाग कार्यालयांतील सहाय्यक आयुक्तांनी परवानगी दिली होती. परवानगीबाबतचा खुलासा अधिकाऱ्यांकडून मागवण्यात आला असून त्यांच्याकडून पुन्हा अशी चूक होणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याचे आदेश परिपत्रकाद्वारे दिल्याचंही महापालिकेकडून सांगण्यात आलं.

न्यायालयाकडून कानउघडणी

त्यावर न्यायालयाने मतप्रदर्शन करताना मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यावर बेकायदा मंडपांवर कारवाई करण्याबाबतची महापालिकेची अडचण समजू शकते. परंतु या बेकायदा मंडपांना नंतर परवानगी देण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. माफी मागितली म्हणजे सगळं संपतं असं नाही. न्यायालय दरवेळेस नरमाईची भूमिका घेऊ शकत नाही, अशा शब्दांत सुनावलं. प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे.


हेही वाचा-

मुंबई शहरात एकही मंडप बेकायदा नाही, महापालिकेचा दावा

तर, विसर्जन मिरवणुकीत खुशाल वाजवा डीजे- राज ठाकरे


पुढील बातमी
इतर बातम्या