१२ फूट उंचीवरचा 'फोर्टचा इच्छापूर्ती'!

सध्या सर्व ठिकाणी बाप्पाच्या आगमनाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. गेले कित्येक महिने लाडक्या बाप्पाच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेल्या भाविकांच्या घरी किंवा मंडळात बाप्पा विराजमान झाला आहे. अशाच मुंबईतील काही निवडक गणपती मंडळाचा इतिहास, फोटो, वैशिष्ट्यांची माहिती 'मुंबई लाइव्ह'च्या वाचकांसाठी.

फोर्टचा इच्छापूर्ती हे गणेश मंडळ फोर्ट विभागातील सर्वात जुनं मंडळ आहे. या मंडळाची स्थापना १९५६ साली झाली. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या मंडळाला यंदा ६३ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्तानं यंदाच्या वर्षी या मंडळानं इच्छापूर्ती पॅलेस बनवला आहे. विशेष म्हणजे या मंडळानं स्वत:च या पॅलेसचं डिझाईन केलं असून ३ महिन्यांपूर्वी हा देखावा साकारण्यास सुरूवात केली होती.

'असं' मिळालं नाव

१९५६ च्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत सामील झालेल्या मुंबईकरांनी एकत्र येऊन या गणपतीची स्थापना केली. सुरूवातीला या गणपतीला केवळ 'सार्वजनिक गणपती' या नावानं ओळखलं जात होतं. त्यानंतर काही भाविकांनी या गणपतीला 'फोर्टचा इच्छापूर्ती' हे नाव दिलं. तेव्हापासून हा गणपती 'फोर्टचा इच्छापूर्ती' या नावानं प्रसिद्ध झाला.

आॅनलाइन दर्शन

सध्याच्या डिजिटल युगात कुठंही मागे पडू नये व भाविकांनी घरबसल्या गणपतीचं दर्शन घेता यावं यासाठी http://fortchaicchapurtiganesh.com/ हे वेबसाईटही मंडळानं सुरू केली आहे. यंदाच्या वर्षीपासून या वेबसाईटवर फोर्टच्या इच्छापूर्तीचं दर्शनही भाविकांना घेता येणार आहे.

मोठे देखावे

संपूर्ण मुंबईत सर्वाधिक मोठे देखावे साकारणारं हे एकमेव मंडळ असून त्यांनी आतापर्यंत पंढरपूरचं विठ्ठल रूक्मिणी मंदिर, महालक्ष्मी मंदिर, तुळजापूरची तुळजाभवानी, १२ ज्योर्तीलिंग, ११ मारूती, २१ गणपती यांसारखी मोठ्या मंदिराचे देखावे साकारले आहेत.

१२ फूट उंचीवर मंडप

विशेष म्हणजे मुंबई हायकोर्टाचे नियम पाळून गणपतीचा मंडप उभारला जातो. फोर्टमध्ये नेहमीच गर्दी असल्यानं ट्रॅफिकला अडथळा येऊ न देता मंडपाची उभारणी होते. जवळपास १२ फूट उंचीवर या मंडपाची उभारणी केली जाते. या मंडपात श्री गणरायाची मूर्ती विराजमान असते. असा आगळावेगळा मंडप बघण्यासाठी अनेक भाविक इथं आवर्जून येतात.


हेही वाचा-

गणेश भक्तांची पसंती थर्माकोल मखरांनाच

'ही' अाहेत मुंबईतील सर्वात जुनी गणेश मंडळं


पुढील बातमी
इतर बातम्या